LIVE UPDATES

मोकाट श्वानांचा उपद्रव थांबवणार अन् जीवही जपणार

देवगड-जामसंडे नगरपंचायतीची निर्बिजीकरण व लसीकरण मोहीम; १५३ श्वानांवर प्रक्रिया पूर्ण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 20, 2026 06:43 PM
views 83  views

देवगड : देवगड-जामसंडे शहरातील मोकाट श्वानांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासह नागरिकांची सुरक्षितता, आरोग्य आणि प्राण्यांचे कल्याण लक्षात घेऊन नगरपंचायतीने निर्बिजीकरण व लसीकरणाची नियोजनबद्ध मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५३ मोकाट श्वानांचे निर्बिजीकरण व लसीकरण पूर्ण करण्यात आले असून, यापुढेही ही कार्यवाही सुरू राहणार आहे. मात्र, या मोहिमेत आढळलेल्या अनियमिततेची दखल घेत संबंधित एजन्सीच्या कामकाजाची चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या मोहिमेसाठी प्रतापराव राणे एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राणी जन्म नियंत्रण (ABC) नियम, २०२३ मधील नियम ४(५) नुसार स्थानिक प्राणी जन्म नियंत्रण समिती (Animal Birth Control Monitoring Committee) गठित करण्यात आली असून, ABC नियम २०२३ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या SUO MOTU WRIT PETITION (CIVIL) No. 5 of 2025 मधील निर्देशांचे पालन करून ही कार्यवाही केली जात आहे.

नगरपंचायतीच्या नागरी सुविधा केंद्राच्या मागील स्वच्छतागृहाच्या इमारतीमध्ये श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी सुसज्ज ABC केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी घडलेल्या घटनेबाबत माध्यमांद्वारे माहिती मिळाल्यानंतर तसेच प्रत्यक्ष निरीक्षण केले असता काही अनियमितता निदर्शनास आली. त्यानंतर संबंधित एजन्सीकडून आतापर्यंत केलेल्या कामकाजाचा अहवाल मागविण्यासह कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाबाबत कठोर कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ABC केंद्रातील स्वच्छता, श्वानांना देण्यात येणारे खाद्य आणि काळजी घेण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मोकाट श्वान पकडल्यानंतर त्यांची पशुवैद्यकीय तपासणी करून आरोग्यदृष्ट्या सक्षम श्वानांचे निर्बिजीकरण व लसीकरण केले जाते. निर्बिजीकरणानंतर श्वानांना पाच ते सात दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना अँटी रेबीज लस देऊन ज्या परिसरातून पकडण्यात आले होते, त्याच परिसरात पुन्हा सोडण्यात येते. निर्बिजीकरण झालेल्या श्वानांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या उजव्या कानावर विशिष्ट ओळखचिन्हही करण्यात येते.

आतापर्यंत १५३ मोकाट श्वानांचे निर्बिजीकरण व लसीकरण पूर्ण झाले असून, नियम व कायद्यांच्या अधीन राहून ही कार्यवाही पुढेही सुरू राहणार आहे. ABC नियमांनुसार नगरपंचायतीच्या वतीने ABC केंद्राची व्यवस्था, पशुवैद्यकीय सेवा, आवश्यक मनुष्यबळ, साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देणे, स्थानिक प्राणी जन्म नियंत्रण समितीस सहकार्य करणे तसेच कार्यक्रमाची नोंद व अहवाल ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

दरम्यान, नागरिकांनी मोकाट श्वानांना विनाकारण मारहाण करू नये किंवा त्रास देऊ नये. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांनी विशेष दक्षता घ्यावी. आक्रमक श्वानांचा कळप किंवा रेबीजची संशयास्पद लक्षणे आढळल्यास स्वतःहून कारवाई न करता नगरपंचायतीकडे माहिती द्यावी. तसेच पाळीव श्वानांचे नियमित लसीकरण व निर्बिजीकरण करून त्यांना मोकाट सोडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

“मोकाट श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नगरपंचायत संवेदनशीलपणे कार्यवाही करत आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे आवाहन देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी केले आहे.