LIVE UPDATES

अन्नपूर्णा नदीतील गाळ काढण्याचे काम अंशतः पूर्ण

उर्वरित काम पुढील वर्षी होणार
Edited by: स्वप्नील लोके
Published on: June 13, 2026 21:13 PM
views 16  views

​देवगड : जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जामसंडे नगरपंचायत नळ पाणी योजना पंप हाऊस, अन्नपूर्णा नदी, मौजे दहिबाव येथील गाळ काढण्याचे अंशतः काम दि. ०९ मे २०२६ व दि. १० मे २०२६ रोजी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित काम पुढील वर्षात करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाकडून कळविण्यात आले असून, या कामाचे निदेशन, पर्यवेक्षण व नियंत्रण कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, ओरोस, सिंधुदुर्गनगरी यांचेकडून करण्यात आले. याकामी देवगड जामसंडे नगरपंचायतकडून संबंधित विभागास आवश्यकतेप्रमाणे पूर्ण सहकार्य व मदत करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी, देवगड जामसंडे नगरपंचायत यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील पूरप्रवण बाधित शहरांमधून वाहणाऱ्या नद्यांमधील पुराचा प्रभाव कमी करणे तसेच नद्यांची वहन क्षमता पुनःस्थापित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यासाठी नदीपात्रातील गाळ, राडारोडा, गाळामुळे निर्माण झालेली बेटे आणि इतर अडथळे दूर करण्यासाठी जलसंपदा विभागाने २५ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार एक विशेष कार्यपद्धती विहीत केली आहे. या कार्यपद्धतीनुसार माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत जिल्ह्यातील आवश्यक कामांची निश्चिती केली जाते व जलसंपदा विभागाकडून ती कामे पूर्ण केली जातात.

​याच मोहिमेचा एक भाग म्हणून मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ९ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे दहिबाव येथील अन्नपूर्णा नदी पंप हाऊस येथील साचलेला गाळ काढण्याच्या व जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या अशाच कामांना मंजुरी देण्यात आली होती. या मंजुरीनंतर कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, ओरोस, सिंधुदुर्गनगरी यांच्या कार्यालयाकडून 'नाम फाउंडेशन' या प्रसिद्ध स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने दहिबाव येथील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या मोहिमेमुळे पाणी पुरवठा केंद्रासमोरील नदीपात्राची वहन क्षमता सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.