LIVE UPDATES

तारामुंबरीसाठी १.३० कोटींची विकासकामे मंजूर

नगराध्यक्ष साक्षी प्रभूंची माहिती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 04, 2026 13:15 PM
views 32  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांना शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असून, तारामुंबरी परिसरातील विकासकामांना यामुळे चालना मिळणार आहे. शासन निर्णयानुसार नगरपंचायतीच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक १७ मधील विविध कामांसाठी एकूण १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी दिली.

मंजूर निधीत प्रभाग क्रमांक १७ येथील तारामुंबरी स्मशानभूमी विकसित करण्यासाठी ७० लाख रुपये, तारामुंबरी येथे नगरपंचायतीच्या तीन सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामासाठी २० लाख रुपये, तर देवगड-जामसंडे नगरपंचायत इमारतीच्या नूतनीकरणासाठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

याशिवाय, राज्याने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यावयाच्या मोटार वाहनांच्या अभिहस्तांतरित रकमेतून रस्ता अनुदान (अनिवार्य) योजनेंतर्गत देवगड-जामसंडे नगरपंचायतीला ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून देवगड पाटील दुकान ते शिवनगर तारामुंबरी जोडणारा रस्ता करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

या विकासकामांमुळे तारामुंबरीसह देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. परिसरातील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

या निधीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांचे नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी विशेष आभार मानले. शासनाच्या सहकार्यामुळे नगरपंचायत क्षेत्रातील विकासाला अधिक गती देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.