
दोडामार्ग : आडाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोन या इमारतीची धोकादायक अवस्था झाली असून ती त्वरित दुरुस्ती करावी. अन्यथा स्वातंत्र्यदिनी शाळेसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन अजित सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, आडाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 2 ची इमारत पूर्णपणे जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहे. या इमारतीची दुरुस्ती करण्याबाबत माझ्यासह ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. परंतु, इमारत दुरुस्ती मंजूर असूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सध्या शाळेच्या छताचा व भिंतीचा काही भाग कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. त्यामुळे शाळेतील लहान मुलांच्या जीवित आला मोठा धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीची दुरुस्ती करावी. जर दुरुस्ती काम सुरू झाली नाही तर 15 ऑगस्ट रोजी शाळेसमोर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसह मुले बेमुदत उपोषण करणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी शासनाची व संबंधित विभागाचे राहील, या आशयाचे निवेदन अजित सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.











