
सावंतवाडी : सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात विजेचा खेळखंडोबा असताना आपत्ती व्यवस्थापन बैठकीस महावितरणचे अधिक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे अनुपस्थित राहिल्याने माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. हक्कभंगाचा इशारा देताच अधिकारी उपस्थित राहिले.
यावेळी १४ दिवस दोडामार्गसह इतर तालुक्यातील भाग अंधारात आहेत. उद्या उर्जा राज्यमंत्र्यांसह याबाबत बैठक आहे. मात्र, तुम्ही बैठकीला का उपस्थित नव्हता ? असा सवाल केला. यावेळी शिष्टमंडळासह असल्याने बैठकीस यायला विलंब झाल्याचे सांगत अधिक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी दिलगीरी व्यक्त केली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी श्री. केसरकर यांनी तुमच्याकडे सुविधांचा अभाव आहे का ? मनुष्यबळ नाही का ? असा सवाल केला. यावेळी अधिकाऱ्यांनी काम सुरू असून आज रात्री व उद्या सकाळपर्यंत आंबोलीसह इतर सह्याद्री पट्टयातील भागातील पुरवठा सुरू होईल असं आश्वासन दिले. तसेच मळगाव, तळवडे, निरवडेसह इतर भागात उद्यापर्यंत पुरवठा सुरू होईल, मळेवाड मधील भागातही काम सुरू आहे अशी माहिती दिली. यावेळी आठ-आठ दिवस लाईट का नाही ? याचे कारण द्या असा प्रश्न श्री. केसरकर यांनी उपस्थित केला. तसेच राज्याच्या उर्जा विभागाला ही माहिती का देत नाही ? असाही सवाल केला.
दरम्यान, दोडामार्ग ३३ केव्ही लाईन चालू झाली असून २ दिवसांत पुरवठा पुर्ववत होईल. टीम घटनास्थळी कार्यरत असून आज आणि उद्यापर्यंत प्रोब्लेम मिटेल अशी माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनी उप कार्यकारी अभियंतांना चारचाकी वाहन द्या, त्यांच्याकडे वाहन नसल्याने ते रात्री फिरत नाहीत. आढावा घेत नाहीत अशी तक्रार केली. यावेळी कार्यकारी अभियंतांनी वाहन उपलब्ध असल्याचे सांगितले. तर वेंगुर्ला रेडी भागातील लाईट उद्यापर्यंत पूर्ववत होईल असंही स्पष्ट केले. यावेळी उद्या उर्जा राज्यमंत्री यांच्यासह होणाऱ्या बैठकीत या समस्यांबाबतची माहिती द्यावी असे आदेश श्री. केसरकर यांनी दिले.












