
वैभववाडी : वाभवे येथील संदेश संतोष साटम (वय २६) या युवकाचा विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर उपचार सुरू असताना आज (ता. २५) सकाळी सहाच्या सुमारास कणकवली येथे मृत्यू झाला. या घटनेची नोंद वैभववाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
संदेश साटम हा वाभवे येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. गेल्या पाच-सहा वर्षांपासून त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही सुरू होते.
सोमवारी दुपारी घरात कोणीही नसताना संदेशने दोन वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर त्याने आपला भाऊ सिद्धेश याला फोन करून विषारी द्रव्य प्राशन केल्याचे सांगितले. माहिती मिळताच सिद्धेश तातडीने घरी पोहोचला आणि संदेशला उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर संदेशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी कणकवलीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. संदेशच्या पश्चात वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. या घटनेप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.










