
देवगड : देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवगड तालुक्यातील वाडा मुळबांध येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीच्यावतीने ‘एक राखी जवानांसाठी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या राखी निर्मिती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी व अंगणवाडीतील चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या.
इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील बालकांनी विविध रंगांच्या साहित्याचा वापर करून सुंदर राख्या तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, जवानांप्रती आदर, बंधुभाव, सामाजिक बांधिलकी आणि सर्जनशीलतेची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून वीर जवानांपर्यंत पाठविण्यात येणार आहेत. सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या मनगटावर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेली राखी बांधली जावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यशाळेस शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ चौगले, अंगणवाडी सेविका अपर्णा जोशी, अंगणवाडी मदतनीस रवीना जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशांक तावडे व उपाध्यक्ष सिद्धी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालकांनीही उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी पूजा तावडे, मिताली लासे, दिपाली बांदिवडेकर, लक्ष्मी जाधव, सतीश जाधव, रुपेश जाधव, दीक्षा गुरव आणि निकिता जाधव यांच्यासह पालक सहभागी झाले.
‘देशासाठी आपणही काहीतरी करू शकतो’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणारा हा उपक्रम ठरला. चिमुकल्या हातांनी तयार केलेली प्रत्येक राखी ही केवळ रक्षाबंधनाचा धागा नसून देशरक्षणासाठी सीमेवर उभ्या असलेल्या वीर जवानांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञतेचा भावनिक संदेश ठरणार आहे.











