LIVE UPDATES

‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’साठी शंभर टक्के योगदान द्या

जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन; आरोग्य अभियानासोबत दुष्काळाविरोधातही एकजुटीने काम करण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 08, 2026 17:54 PM
views 20  views

सिंधुदुर्गनगरी : ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानातील बक्षीस मिळविणे हा केवळ एक भाग आहे. मात्र, कोणतेही काम करताना शंभर टक्के तन-मन-धनाने योगदान देण्याची भूमिका ठेवली पाहिजे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला या अभियानात राज्यात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.

‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर, उपाध्यक्ष तुकाराम तथा दादा साईल, आरोग्य व शिक्षण सभापती सभापती प्रितेश राऊळ, वित्त व बांधकाम सभापती संतोष सटविलकर, महिला व बालविकास सभापती अनुराधा नारकर, समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, माजी जिल्हापरिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. श्रीपाद पाटील, पंचायत समिती सभापती, आरोग्य विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अध्यक्ष कामत म्हणाले की, अभियानात बक्षीस मिळविणे हा उद्देश असला तरी त्यापेक्षा प्रत्येक गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहणे, प्रत्येकाला आवश्यक आरोग्य सुविधा वेळेवर मिळणे, कुपोषित बालकांची संख्या शून्यावर आणणे आणि समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे हे अधिक महत्त्वाचे आहे.

एकल महिला, वृद्ध आणि गरजूंपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवा

गावातील एकल महिला, वृद्ध आणि आरोग्याच्या कारणामुळे घराबाहेर पडू न शकणाऱ्या व्यक्तींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काही वृद्ध व्यक्तींकडे उपचारासाठी पैसे असले तरी त्यांना औषधे आणण्यासाठी किंवा रुग्णालयात जाण्यासाठी मदत करणारे कोणी नसते. अशा व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांच्या आरोग्याची चौकशी करणे आणि आवश्यक मदत उपलब्ध करून देणे, ही सामूहिक जबाबदारी आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर आणि चांगले आरोग्य मिळण्यासाठीही सर्वांनी प्रयत्न करावेत. सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांनी आपल्या परिसरातील प्रत्येक घटकाला या अभियानाशी जोडावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘सिंधुदुर्ग नंबर वन’चा विश्वास

कार्यशाळेतील उत्साह पाहता सिंधुदुर्ग जिल्हा या अभियानात राज्यात अव्वल येईल, असा विश्वास आहे. आपण स्वतः प्रयत्न करणारच आहोत; मात्र आपल्या मित्रमंडळींना, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना आणि विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांनाही या अभियानाची माहिती देऊन त्यांना सहभागी करून घ्यावे. हे अभियान केवळ आरोग्य विभागाचे न राहता संपूर्ण जिल्ह्याचे अभियान झाले पाहिजे, असे कामत म्हणाले.

आरोग्य अभियानासोबत दुष्काळाविरुद्धही एकजुटीने लढा

सिंधुदुर्ग जिल्ह्यासमोर आरोग्याबरोबरच दुष्काळाचेही मोठे संकट उभे राहिले आहे. १९७० नंतरचे मोठे दुष्काळी संकट जिल्ह्यासमोर असल्याने नागरिकांना त्याची झळ पोहोचण्यापूर्वीच उपाययोजना करण्याची गरज आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा यासाठी बंधारे, जलतारा आणि शोषखड्डे उभारण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामपंचायतींना जलसंधारणाच्या कामांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, स्थानिक पातळीवर शोषखड्डे आणि इतर जलसंधारणाची कामे सुरू झाली आहेत. या कामांमुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवता येईल. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होईल.

२ हजार ४४३ वनराई बंधारे पूर्ण 

जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ४४३ वनराई बंधारे उभारण्यात आल्याची माहिती अध्यक्ष कामत यांनी दिली. बचत गटांचाही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, सुमारे १ हजार २४३ बचत गटांनी वनराई बंधारे उभारण्यात सहभाग घेतला आहे. बचत गटांनी आणखी मोठ्या प्रमाणावर बंधारे उभारण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन करताना कामत यांनी कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक, नागरिक आणि विविध संस्थांनी उपलब्ध असलेल्या रिकाम्या सिमेंटच्या पोत्यांचा उपयोग करून ती ग्रामपंचायतींकडे उपलब्ध करून द्यावीत, असेही सांगितले. ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या समन्वयातून या साहित्याचा वापर करून अधिकाधिक वनराई बंधारे उभारता येतील.

‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानासाठी ज्या एकजुटीने काम सुरू आहे, त्याच ताकदीने दुष्काळाच्या संकटाचाही सामना करण्याची गरज आहे. नागरिकांना संकटाची झळ पोहोचण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्वांनी एकसंघपणे काम करावे, असे आवाहन प्रमोद कामत यांनी केले.

‘आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप द्या :अपूर्वा बासुर 

आरोग्य विभागाबाबत कोणत्याही प्रकारचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने प्रतिबंधात्मक आरोग्य आणि उपचार या दोन्ही बाबींवर समान गांभीर्याने काम करणे आवश्यक आहे. ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ ही केवळ आरोग्य विभागाची मोहीम न राहता सर्व विभाग आणि लोकसहभागातून उभी राहणारी चळवळ झाली पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अपूर्वा बासुर यांनी यावेळी बोलताना केले.