
सावंतवाडी : तांबुळी केंद्रांतर्गत केंद्रस्तरीय चौथी शिक्षण परिषद जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, भालावल, सावंतवाडी येथे बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. केंद्रातील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध शैक्षणिक विषयांवर विचारमंथन व अनुभवांची देवाणघेवाण केली.
परिषदेच्या प्रारंभी केंद्रप्रमुख श्रीमती ज्योत्स्ना देसाई (तांबुळी) यांनी मागील महिन्यातील शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला. श्रीमती स्वाती देसाई (कोनशी) यांनी वर्गातील कामकाजादरम्यान आलेल्या अडचणी, लक्षवेधी बाबी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत शिक्षकांशी संवाद साधला. डॉ. राजेंद्र चव्हाण (कोनशी) यांनी विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती, Learning Gap, अध्ययन निष्पत्ती आणि ऑक्टोबर महिन्याचे मासिक नियोजन यावर मार्गदर्शन केले.
तसेच MyGooru ॲपवरील Hands-on Activity घेऊन शिक्षकांकडून प्रत्यक्ष ऑक्टोबर महिन्याचे मासिक नियोजन तयार करून घेण्यात आले. श्रीमती स्वाती गवस (असनिये) यांनी पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि समुदाय सहभाग, शैक्षणिक ग्रामसभा तसेच पालक सभांचे प्रभावी आयोजन, शैक्षणिक उपक्रम, रोस्टर, मासिक पाळी व्यवस्थापन, याबाबत मार्गदर्शन केले. आशिष तांदुळे (घारपी) यांनी PGI, SQAAF आणि जयंत नारळीकर अध्ययन समृद्धी कार्यक्रम अंतर्गत खान ॲकेडमी प्लॅटफॉर्म चे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच इन्स्पायर अवॉर्ड आणि रंगोत्सव याबाबतही माहिती दिली. केंद्रप्रमुख श्रीमती ज्योत्स्ना देसाई (तांबुळी) यांनी शैक्षणिक प्रक्रियेचे सांख्यिकी विश्लेषण तसेच विविध शासकीय शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.
परिषदेत शिक्षकांनी विविध शैक्षणिक अनुभव, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि अध्यापनातील कल्पना मांडल्या. चर्चात्मक, अनुभवाधारित आणि सहभागात्मक पद्धतीने झालेल्या या परिषदेमुळे आगामी शैक्षणिक नियोजनासाठी शिक्षकांना उपयुक्त दिशा मिळाली. परिषदेचे सूत्रसंचालन विठ्ठल कुंभार (भालावल) यांनी केले. तर श्रीमती स्वाती देसाई (कोनशी) यांनी आभार मानले. परिषदेच्या आयोजनासाठी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, भालावल येथील मुख्याध्यापक गुंडोजी ढवळी, श्रीमती निलेखा गौंडळकर, श्री रुपेशकुमार गुंजाळ आणि श्री विठ्ठल कुंभार यांनी उत्कृष्ट नियोजन करून बैठक व्यवस्था, शैक्षणिक वातावरण आणि भोजनाची उत्तम व्यवस्था केली व शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी यांनी विशेष सहकार्य केले. उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात ही केंद्रस्तरीय शिक्षण परिषद यशस्वीपणे संपन्न झाली.












