LIVE UPDATES

वैभववाडीत उघड्या गटारांवरून नागरिकांचा संताप

५ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 29, 2026 17:50 PM
views 46  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

वैभववाडी :  वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ९ व १० मध्ये उघड्या गटारांमुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाने तातडीने गटारांवर काँक्रीट स्लॅब अथवा झाकणे  बसवावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

येत्या आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास ५ ऑक्टोबरपासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा रत्नमोल बारक्या निकम व स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.याबाबत नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

 ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शहरातील प्रभाग क्रमांक ९ व १० मध्ये  नगरपंचायतीमार्फत गटार बांधण्यात आले आहे. मात्र, हे गटार उघडे असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक सोयीसाठी करण्यात आलेले हे बांधकाम स्थानिक रहिवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

या उघड्या गटारामुळे परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे लहान मुले व वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे रहिवाशांनी म्हटले आहे.तसेच रात्रीच्या वेळी या उघड्या गटारात जनावरे,  कुत्र्यांची पिल्ले पडून अडकण्याच्या घटना घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुत्र्यांची पिल्ले गटारात पडल्यानंतर मोठमोठ्याने ओरडत असल्याने मध्यरात्री एक ते दोन वाजेपर्यंत नागरिकांना उठून त्यांना बाहेर काढावे लागते. यामुळे नागरिकांची झोपमोड होत असून लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक गटारात पडून गंभीर जखमी होण्याची अथवा जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन या उघड्या गटारांवर  काँक्रीट स्लॅब अथवा झाकणे बसवून मार्ग सुरक्षित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने येत्या आठ दिवसांत कार्यवाही न केल्यास सोमवार, ५ ऑक्टोबर पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,या ठिकाणी पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून गटाराचे काम मंजूर झाले आहे.येत्या महीनाभरात हे काम होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.