
वेंगुर्ला : चालू वर्षी पर्जन्यमान अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ट्रिगर-१’ लागू करण्यात आला आहे. कमी पावसामुळे भूजल पातळी खालावण्याची शक्यता असून आगामी काळात संभाव्य पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यात जलसंवर्धनाची कामे मोहीम स्वरूपात राबविण्याचा निर्णय वेंगुर्ला पंचायत समितीने घेतला आहे.
याअंतर्गत २ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ‘विशेष वनराई बंधारे व कच्चे बंधारे श्रमदान मोहीम’ राबविण्यात येणार आहे. वाहून जाणारे पाणी जागच्या जागी अडवून त्याद्वारे भूजल पुनर्भरण करण्यासाठी ग्रामपंचायतींनी लोकसहभागातून जास्तीत जास्त बंधारे उभारावेत, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक व सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांनी केले आहे.
या मोहिमेत प्रत्येक गावातील ओढे, नाले व नैसर्गिक पाण्याचे प्रवाह यांची पाहणी करून पाणी अडविण्यासाठी योग्य ठिकाणांची प्राधान्याने निवड करण्यात येणार आहे. वनराई बंधाऱ्यांसाठी आवश्यक रिकाम्या गोण्या, वाळू-माती तसेच इतर साहित्याची पूर्वतयारी ग्रामपंचायत स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मोहिमेला व्यापक स्वरूप देण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुढाकार घ्यावा, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना सहभागी करून घ्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय युवक मंडळे, महिला बचत गट, शेतकरी, स्वयंसेवी संस्था, महिला मंडळे, सेवाभावी संस्था तसेच शाळा-महाविद्यालयांतील एनएसएस व स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामसेवक, कृषी सेवक व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मोहिमेदरम्यान बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांची संख्या, झालेला जलसाठा आणि कामांची छायाचित्रे यासह दैनिक तसेच अंतिम अहवाल पंचायत समिती कार्यालयास सादर करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.
‘गावातील पाणी गावातच अडवा’ या भूमिकेतून सर्वांनी एकत्रितपणे श्रमदान केल्यास भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मोठी मदत होईल. त्यामुळे २ ते १५ ऑक्टोबरदरम्यानची ही जलसंवर्धन मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.










