LIVE UPDATES

Sawantwadi Eco-Friendly Ganeshotsav : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कृत्रिम विसर्जन कुंडात ४५ गणेशमूर्तींचे विसर्जन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 29, 2026 18:23 PM
views 24  views
Sawantwadi Eco-Friendly Ganeshotsav 45 Ganesh Idols Immersed in Artificial Ponds

सावंतवाडी : गणेशोत्सवात अधिकाधिक पर्यावरणपूरक, स्वच्छ व प्लास्टिकमुक्त पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ आणि ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत विशेष उपक्रम राबवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहानाला सावंतवाडीतील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

नगरपरिषदेच्या वतीने माहितीपत्रकांचे वाटप करून नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करणे, सजावटीमध्ये नैसर्गिक साहित्याचा वापर करणे, ध्वनीप्रदूषण टाळणे, वीज बचत करणे, निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करणे तसेच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

जलप्रदूषण टाळण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील बोट क्लब, निर्माण भवन जवळ, शिवउद्यान समोरील बाजू, भटवाडी, सर्वोदय नगर, जुस्तीन नगर, मराठा वसतीगृह नजीक आणि होळीचा खुंट अशा विविध प्रमुख ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन कुंड बसवले होते.

विसर्जनाच्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन कुंडामध्ये फुलांची सुंदर आरास करण्यात आली होती. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रत्येक विसर्जन कुंडाच्या ठिकाणी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

नगरपरिषदेच्या या आखीव-रेखीव आणि चोख व्यवस्थेमुळे नागरिकांनी कृत्रिम विसर्जन कुंडांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. या उपक्रमांतर्गत एकूण ४५ गणपती मूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यात आले.

पर्यावरणपूरक सण साजरे करताना जलप्रदूषण रोखण्यासाठी नगरपरिषदेकडून भविष्यातही अशाच प्रकारच्या मोहिमा मोठ्या प्रमाणात राबवल्या जातील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.