
देवगड : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना तळागाळातील मच्छिमारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांच्यावतीने बुधवारी देवदुर्ग मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, देवगड येथे मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना व ईईझेड नियम-२०२५ जनजागृती कार्यक्रम, तसेच ॲक्सेस पास व उच्च समुद्र प्राधिकरण पत्र वितरण व मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.
मंगळवारी देवदुर्ग मच्छीमार संस्था या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ उद्योजक नंदकुमार घाटे ,तारामुंबरी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष विनायक प्रभू, देवगड मत्स्यव्यवसाय संस्थेचे द्विजिकांत कोयंडे, देवदुर्ग मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष तुषार पारकर, मेमन, ज्ञानेश्वर खवळे, उल्हास मणचेकर,विविध मत्स्यव्यवसाय संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, नौका मालक आणि मोठ्या संख्येने मच्छिमार उपस्थित होते.
या शिबिरात मुंबई येथील फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया (FSI) च्या तज्ज्ञांनी आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी मच्छिमारांना नव्या नियमांची, योजनांची आणि आवश्यक परवान्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी अनेक मच्छिमारांची ॲक्सेस पास नोंदणीही पूर्ण करण्यात आली. कार्यक्रमात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ, ईईझेड नियम-२०२५, ॲक्सेस पास व उच्च समुद्र प्राधिकरण पत्राची आवश्यकता, पात्र नौका मालक शामराव पाटील (प्रातिनिधिक स्वरूपात) परवाना वितरित करण्यात आला. त्या पद्धतीने नोंदणी पूर्ण होईल त्याप्रमाणे हे परवाने वितरण होतील. तसेच टर्टल एक्सक्लुडर डिव्हाईस (TED) बसविण्याचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त (मत्स्यव्यवसाय) सागर कुवेसकर यांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील विविध लाभांची माहिती देत जास्तीत जास्त मच्छिमारांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी प्रतीक महाडवाला यांनी ईईझेड नियमांची सविस्तर माहिती दिली, तर देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी प्रत्येक नौका मालकाने ॲक्सेस पास घेणे आवश्यक असल्याचे सांगत परवाना कार्यालयात ही सुविधा पूर्णपणे निःशुल्क उपलब्ध असल्याची माहिती दिली.
फिशरी सर्व्हे ऑफ इंडियाचे झोनल डायरेक्टर डॉ. विनोद कुमार यांनी शाश्वत मासेमारीसाठी ॲक्सेस पासचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच भारताला आंतरराष्ट्रीय मत्स्यव्यवसाय बाजारपेठेत अधिक सक्षम स्थान मिळवून देण्यासाठी जागतिक मानकांनुसार TED बसविणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. देवानंद उईके यांनी ॲक्सेस पास नोंदणी प्रक्रिया प्रत्यक्ष समजावून सांगितली, तर अशोक कदम यांनी ईईझेडमधील टूना मासेमारीच्या संधी आणि नियमांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन FSIचे शास्त्रज्ञ स्वप्नील शिर्के यांनी केले.










