
वैभववाडी : पाणी संवर्धनाचे महत्त्व ओळखून पावसाचे पाणी अडवणे आणि जमिनीत जिरवण्यासाठी सोनाळी नंबर १ येथील शाळेच्या विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावातील ओहळावर सर्वांनी एकत्र येत श्रमदानातून बंधारा बांधला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्याबरोबरच ग्रामस्थांमध्येही पाणी बचतीचा संदेश देण्यात आला.
यावर्षी सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.त्यामुळे पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी जलसंवर्धनाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविल्यास भूजलपातळी वाढण्यास मदत होते. याच उद्देशाने सोनाळी शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत ओहळावर बंधारा उभारला. अशा उपक्रमांमुळे पाण्याचे महत्त्व समजण्यासोबतच श्रमदान, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजण्यास मदत झाली
या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र साळुंखे, शिक्षिका प्रियांका रावराणे, मृणाल गोसावी, शिक्षक ओंकार गुरव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बोभाटे, सदस्य दुर्वा शेलार, प्राजक्ता भोसले, नितेश शेलार यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.शाळेच्या या उपक्रमांच कौतुक केले जात आहे.












