LIVE UPDATES

बॅ. नाथ. पै सेवांगणतर्फे कविता रसग्रहण स्पर्धेचे सावंतवाडीत आयोजन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 16:25 PM
views 34  views

सावंतवाडी : मालवण येथे बॅ नाथ पै सेवांगण या संस्थेच्या वतीने दुसरे जिल्हा साहित्य संमेलन 28 व 29 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्पर्धांचे आयोजन जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी केले गेले आहे. त्या अंतर्गत कविता रसग्रहण स्पर्धा सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिरच्या ‘शतकोत्तर अमृत महोत्सवी मुक्त संवाद कार्यक्रम समिती’च्या विद्यमाने रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता वाचनालयाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. 

हे वर्ष कवी नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष व थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचे जन्म द्विशताब्दी वर्ष असल्याने या दोघांच्या कोणत्याही कवितांचे रसग्रहण स्पर्धकांना करायचे आहे. नारायण सुर्वे यांची कोणतीही कविता किंवा महात्मा फुले यांचा आठ ते दहा चरणांचा अखंड निवडून त्यांचे वाचनासहित रसग्रहण सात मिनिटांच्या कालावधीत करणे अपेक्षित आहे. 

या स्पर्धेसाठी पारितोषिके पुढील प्रमाणे आहेत - प्रथम क्रमांक - रूपये तीन हजार, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट, द्वितीय क्रमांक- रूपये दोन हजार, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट, तृतीय क्रमांक- एक हजार, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट, उत्तेजनार्थ दोन - प्रत्येकी पाचशे रूपये व ग्रंथभेट सर्व विजेत्यांना पारितोषिके मालवण येथे होणाऱ्या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी सन्मानपूर्वक देण्यात येतील. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धकांनी आपली नावे राजेश मोंडकर (९४२३३०१७३१) किंवा विठ्ठल कदम (९८२३०४८१२६) या वॉटस अप नंबरवर दि. २४ ऑक्टोबरपर्यंत नोंदवावीत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संमेलन स्पर्धा संयोजक ज्योती बुवा तोरस्कर, प्रा. सुमेधा नाईक, लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे.