
सिंधुदुर्ग : दशावताराच्या समृद्ध रंगभूमीवर काळानुरूप नवनवीन आख्याने आणि प्रयोग सादर होत असून त्यामुळे या लोककलेला नवचैतन्य मिळत आहे. कोकण, गोवा आणि कोल्हापूर परिसरात दशावताराच्या शेकडो प्रयोगांच्या माध्यमातून ही लोककला रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. याच परंपरेत गतवर्षी ‘देवावतारी बाळूमामा’ या भूमिकेतून विशेष नावाजलेले दशावतारातील युवा कलाकार अभिनय कुमार नितीन आसयेकर यांनी यंदाच्या पर्वात ‘साईबाबा’ या आध्यात्मिक आणि भक्तिप्रधान ट्रीक सीन युक्त कथानकाची रंगभूमीवर आगळीवेगळी मेजवानी आणली आहे.
नितीन आसायेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ, मळगाव, सावंतवाडी या मंडळाचे लेखक-दिग्दर्शक नितीन आसयेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला भव्य-दिव्य, ट्रिक्सिनयुक्त ‘साईबाबा’ नाट्यप्रयोगाने सध्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे या नवरात्रोत्सवामध्ये गावोगावी सध्या साईबाबा या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात येत आहे.
पहिल्याच प्रयोगापासून या नाट्यप्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद प्राप्त होत असताना पाहायला मिळाला प्रत्येक गावी रसिकांची मोठी गर्दी लाभली. आध्यात्मिक कथानक, प्रभावी संवाद, आकर्षक रंगभूषा आणि ट्रिक्सिनच्या प्रयोगांमुळे संपूर्ण नाट्यप्रयोगाला वेगळीच रंगत आली.
साईबाबांच्या प्रमुख भूमिकेत नितीन आसयेकर यांनी आपल्या भारदस्त, संयमी आणि प्रभावी अभिनयातून साईबाबांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत सजीवपणे उभे केले. त्यांच्या अभिनयातील भाव-भक्ती , संवादफेक आणि रंगमंचावरील वावराने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
विशेषतः ट्रिक्सिनच्या प्रयोगांनी नाट्याला आध्यात्मिकतेसोबतच दृश्यात्मक भव्यता प्राप्त झाली. त्यांच्यासोबत सिद्धार्थ मेस्त्री, देवेश कूडव, स्वप्निल नाईक, नारायण कुंभार, महादेव शळके, प्रथमेश मसुरकर, शेखर काकतकर , प्रसाद तळकटकर,भगवान सावळ, या कलाकारांनी आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारत प्रयोगाला उत्तम साथ दिली.
या नाटकाला प्रकाश योजना संजय मांजरेकर, दीप मांजरेकर,दीपतेश केळुस्कर यांनी उत्कृष्ट प्रकाश योजना दिली. सहाय्यक -शाम नाईक, आबा माणगावकर, तसेच ट्रीक सीन रंगश्री ट्रीक सीन ग्रुप नेरुर,प्रवीण लिंगे गौरेश नेरुळकर, सुनील मेस्त्री कल्पेश मार्गी आणि इतर सहाय्यक नाट्यप्रयोगाला दिनेश राऊळ (हार्मोनियम), किसन नेमळेकर (पखवाज) आणि विनायक राऊळ (झांज) यांच्या उत्कृष्ट संगीतसाथीने विशेष रंगत आणली. संगीत आणि अभिनयाच्या सुरेख मेळामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
बालकलाकार कु.अनुरा बादल चौधरी हिने साकारलेली लक्ष्मीची भूमिका देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. तिच्या अभिनयाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.दशावताराच्या पारंपरिक चौकटीला आधुनिक तंत्राची आणि आध्यात्मिक कथानकाची जोड देणाऱ्या ‘साईबाबा’च्या पहिल्याच प्रयोगाने रसिकांच्या मनावर मोहिनी घातली.
नितीन आसयेकर यांच्या अभिनयाची ताकद आणि संपूर्ण कलाकारांच्या मेहनतीमुळे हा प्रयोग दशावताराच्या रंगभूमीवरील यशस्वी आणि लक्षवेधी प्रयोग ठरला असून, आगामी काळात या प्रयोगाला कोकण-गोवा परिसरातील रसिकांकडून मोठी पसंती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










