
सावंतवाडी : ज्या तंत्रज्ञानाला आपण फक्त माहिती शोधण्यासाठी वापरतो, त्याच एआयने तब्बल अडीच वर्षांपासून हरवलेल्या एका महिलेला तिच्या कुटुंबाशी पुन्हा भेटवलंय ! ही सत्य घटना महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे.
४५ वर्षीय जुलेखा शेख मानसिक तणावामुळे अडीच वर्षांपूर्वी अचानक घर सोडून निघून गेल्या होत्या. ३ एप्रिल २०२४ रोजी कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना सिंधुदुर्गच्या पणदूर येथील 'संविता आश्रमात' दाखल करण्यात आलं. पण त्यांची स्मृती आणि संवाद अस्पष्ट असल्याने त्यांच्या गावाचा आणि घरच्यांचा पत्ता लागत नव्हता.
अशा वेळी 'जीवन आनंद संस्थेचे' किसान चौरे आणि त्यांच्या टीमने जुलेखा यांच्याशी रोज संवाद साधायला सुरुवात केली. त्यांच्या बोलण्यातून मिळणारे छोटे-छोटे संदर्भ एकत्र केले आणि मदतीला घेतलं गुगल सर्च आणि चॅट जीपीटी ला! या डिजिटल साधनांच्या मदतीने अचूक माहिती जुळवत संस्थेने थेट परभणीतील त्यांच्या मूळ गावाचा शोध लावला.
परभणीच्या निर्भया पोलीस पथकाच्या मदतीने जुलेखा यांच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला. तब्बल अडीच वर्षांनी फोनवर आवाज ऐकताच कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. ९ नोव्हेंबर रोजी त्यांचे पती मुखीद शेख यांनी सिंधुदुर्ग गाठलं आणि आपल्या पत्नीला सुखरूप घरी नेलं. माणुसकीची तळमळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाली, तर अशक्यही शक्य होतं, हेच या घटनेने सिद्ध केलंय.
संकलन - स्वप्निल परब
मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








