
दोडामार्ग : पंचायत समिती दोडामार्ग आणि ग्रामपंचायत घोटगेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित " सभापती आपल्या दारी – जनसंवाद | लोकसहभाग | विकासाचा संकल्प" हा उपक्रम घोटगेवाडी येथील दत्त मंदिर सभागृहात नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमातून कोनाळ पंचायत समिती मतदार संघातील ग्रामस्थांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती दोडामार्गच्या सभापती सौ. पार्वती महादेव गवस होत्या, तर उपसभापती गणेशप्रसाद गवस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस, जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता धर्णे, पंचायत समिती सदस्य सौ. सायली निंबाळकर, संजय सातार्डेकर, सौ. सोनिया कुबल, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र निंबाळकर, घोटगेवाडीचे सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे, तेजस देसाई, ग्रामपंचायत अधिकारी सुजय थेटे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल दळवी, नूतन पांगम तसेच केर, मोर्ले व कोनाळकट्टा येथील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्वागतगीत सादर करण्यात आले. ग्रामपंचायत घोटगेवाडीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. केर गावचा सुपुत्र व घोटगेवाडी प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी कौशल देसाई याची अग्निवीर म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर कोनाळ गणातील ग्रामस्थांनी रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांशी संबंधित विविध समस्या मांडल्या. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून खातेनिहाय माहिती घेऊन समस्यांच्या निवारणासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांची लेखी निवेदनेही सभापतींकडे सुपूर्द केली.
घोटगेवाडीचे सरपंच श्रीनिवास शेटकर यांनी गावाच्या विकासासाठी पाच प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये स्मशानभूमीचे बांधकाम, कोनाळकट्टा–घोटगेवाडी ११ केव्ही जुन्या वीजतारा बदलून केबल टाकणे, नळ योजनेसाठी ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारणे, घोटगेवाडीसाठी स्वतंत्र तलाठी सजा मंजूर करणे तसेच घोटगेवाडी, केर, मोर्ले व भेकुर्ली या गावांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका सौ. दिक्षा दळवी यांनी केले. उपसरपंच सागर कर्पे यांनी आभार प्रदर्शन करताना कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या पंचायत समितीच्या पदाधिकारी, अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल बाळकृष्ण मणेरीकर यांचे आभार मानले. तसेच ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व समस्या आणि निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमास कोनाळ गणातील १४ गावांतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.











