LIVE UPDATES

चिमुकल्यांनी केली आईची पाद्यपूजा

अंगणवाडी क्रमांक १५ च्या बालकांनी जपली भारतीय संस्कृती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 29, 2026 17:48 PM
views 22  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : गुरुपौर्णिमेस गुरुला वंदन करण्याची भारतीय संस्कृती आहे. आपल्या जीवनात 'पहिली गुरू' म्हणून नेहमीच आईचा सर्वोच्च सन्मान केला जातो. याच संस्कारांची शिदोरी बालवयातच चिमुकल्यांच्या मनात रुजवण्यासाठी शहरातील अंगणवाडी क्रमांक १५ मध्ये  आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील तीन ते पाच वर्षे वयोगटातील चिमुकल्यांनी स्वतःच्या आईची पाद्यपूजा करून आणि औक्षण करून अत्यंत उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी केली.

अंगणवाडी सेविका अनुराधा पवार आणि मदतनीस अमिषा सासोलकर यांनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बालवयातच मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत, या उद्देशाने शिशु वाटिका व अंगणवाडीच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान चिमुकल्यांनी प्रथम पाद्यपूजा केली, त्यानंतर आईला औक्षण करून तिचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मुलांनी "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा..." हे श्लोक आणि आईचे महत्त्व सांगणारी गीते अत्यंत सुरेल आवाजात गायली, ज्यामुळे संपूर्ण अंगणवाडी परिसर भक्तिमय आणि भावूक वातावरणाने व्यापून गेला होता. या भावूक व धार्मिक कार्यक्रमात अंगणवाडीतील चिमुकली ष्रिशा देशमुख, स्वराज गोरे, दुर्वाश जाधव, समर्थ नेवगी, गितांश मुंज, नियात, शब्दाली कदम, रुद्राली बेळगावकर, अलिषा दापले, दुर्वा नाईक, अर्पिता कडगावकर, दक्षायनी, नितेश चव्हाण, हितेश बांदेकर, लकी शर्मा, वीरा रेडकर, दुर्वा कोरगावकर, रसिका गोरे, मल्हार लाखे, श्रुती गावडे व मोक्षतारी या बालकांनी सहभाग घेतला.तसेच आपल्या पाल्यांच्या या उपक्रमात श्रेया नेवगी, ज्योती कदम, आरती दापले, आर्या मुंज, अवंतिका गोरे आणि दिलीप देशमुख यांच्यासह सर्व पालक व माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लहानग्यांनी घेतलेल्या या दर्शनाने सर्वच मातांचे डोळे अभिमानाने व प्रेमाने पाणावले. अंगणवाडीच्या या उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.