
सावंतवाडी : गुरुपौर्णिमेच्या मंगलमय दिवशी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा संकल्प घेऊन 'सक्षम स्त्री फाउंडेशनची स्थापना एका आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी वातावरणात करण्यात आली. पारंपरिक उद्घाटनाऐवजी गो-सेवेचा संदेश देत फाउंडेशनच्या कार्याचा गो शाळेत शुभारंभ करण्यात आला.
गोमातेचे पूजन, गोसेवा आणि समाजसेवेचा संकल्प यांद्वारे या सामाजिक कार्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सभासदांनी महिला सक्षमीकरण, स्वावलंबन, शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मिती आणि समाजहितासाठी निःस्वार्थपणे कार्य करण्याची प्रतिज्ञा केली. फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सौ. नीलम परिमल नाईक, उपाध्यक्षपदी सौ. मेघा जयराम राणे, खजिनदारपदी सौ. दुलारी दिलेश रांगणेकर , सहखजिनदारपदी सौ. अंकिता प्रतीक बांदेकर तसेच सचिवपदी सौ. सुनीता अमित पेडणेकर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित सर्व सदस्यांनी समाजातील प्रत्येक महिलेला आत्मनिर्भर, सक्षम आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि स्वयंरोजगारविषयक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. गुरूंच्या आशीर्वादाने, गोसेवेच्या साक्षीने आणि समाजसेवेच्या संकल्पाने ‘सक्षम स्त्री फाउंडेशन’च्या सामाजिक प्रवासाची आज प्रेरणादायी सुरुवात झाली, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. भारतीय संस्कृती, सेवा, करुणा आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रतीक म्हणून गोशाळेतून कार्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वागत नाटेकर, कृष्णा धूळपनावर, लादू रायका आदी गोरक्षक उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.










