LIVE UPDATES

Malwan Fire News : आडारी माळरानाला वणव्याने घेरले

आंबा-काजूच्या बागा जळून खाक ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 14, 2026 04:02 PM
views 187  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

मालवण : आडारी माळरानावर शॉर्टसर्किटने आग लागून आडारी, खैदा, न्हीवे परिसर जळून खाक झाला. या आगीत ढोलम, पाटकर, करलकर, पाताडे, लाड, आचरेकर यांच्या मालकीची काजू कलमे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पेटून गेली. आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

आडारी माळरानावर आग लागल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी तातडीने मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याशी संपर्क साधला. आगीचा वाढता धोका लक्षात घेता अग्निशमन बंब तातडीने पाठविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांच्या या मागणीची तत्काळ दखल घेत नगराध्यक्षा वराडकर यांनी विलंब न करता अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना केला. 

अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.  त्यांच्या प्रयत्नांमुळे काही प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने अनेक काजू कलमे जळून खाक झाली. कडाक्याचे उन्ह असल्याने आगीचे लोट सर्वत्र पसरू लागले. त्यामुळे एकच बंब कुठची आग आटोक्यात आणणार असा प्रश्न निर्माण झाला. चारही बाजूने आग पेट घेत होती. सकाळी लागलेली आग आटोक्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत आगीची माहिती घेतली. 

दरम्यान, दुपारनंतर आगीने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले. काही वेळातच आगीचा भडका वाढत गेला आणि आगीचे लोट आडारी, खैदा तसेच न्हीवे माळराण परिसरात पसरले. या वणव्याच्या तडाख्यात आंबा आणि काजूच्या बागांसह अनेक कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. क्षणार्धात हिरव्यागार बागा शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर पेटून गेल्या. या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

या आगीत ढोलम, पाटकर, करलकर, पाताडे आणि लाड यांच्या काजू कलमांचे नुकसान झाले असून, आडारी, खैदा आणि न्हीवे परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या आंबा-काजू बागांनाही फटका बसला आहे. वणव्यामुळे शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनत वाया गेली आहे. तलाठी यांनीही घटनास्थळी पाहणी करत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली.