LIVE UPDATES

रक्तदान हे जीवनदान देणारे श्रेष्ठ माध्यम : दीपक केसरकर

सावंतवाडीत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 24, 2026 18:44 PM
views 29  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : रक्तदान हे अत्यंत पवित्र कार्य असून गरजू रुग्णांना थेट जीवनदान देणारे श्रेष्ठ माध्यम आहे. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करावे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केले.

 सावंतवाडीत सेवा देणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद खानोलकर यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याचा वारसा कुटुंबाने तसाच पुढे ठेवावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केल.

घे भरारी फाउंडेशन सावंतवाडी, सावंतवाडी पोलीस, डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब, ओंकार कलामंच आणि श्री औदुंबर स्वामी मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक विणा जाधव, सभापती मोहीनी मडगावकर,डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. मिलिंद खानोलकर, डॉ. अभिजीत चितारी, डॉ‌.संजना देसकर, माजी नगरसेवक विलास जाधव, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हरिचंद्र पवार, घे भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष ज्योती दुधवडकर, अमोल टेंबकर, भुवन नाईक आदी उपस्थित होते‌. 

या शिबिराच्या उद्घाटना दरम्यान डॉ. अरविंद खानोलकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

  केसरकर पुढे म्हणाले, अपघात, गंभीर आजार तसेच विविध वैद्यकीय उपचारांदरम्यान अनेक रुग्णांना तातडीने रक्ताची आवश्यकता भासते. अशावेळी रक्तदात्यांनी केलेले रक्तदान एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत मोलाचे ठरते. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानाबाबत जनजागृती करून नियमितपणे या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 

अत्यंत व्यस्त वेळापत्रक असतानाही डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपत या शिबिरासाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आणि मंदिर समिती यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी श्री. भागवत यांनीही शिबिराला शुभेच्छा दिल्या. आयोजकांकडून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या शिबिराच्या माध्यमातून रक्तदानासोबतच नागरिकांना आरोग्य तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. 

त्यामुळे गरजू नागरिकांनी अशा आरोग्यविषयक उपक्रमांचा लाभ घ्यावा,  विविध संस्था, पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्रितपणे राबविलेला हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी असून, रक्तदाते आणि आयोजकांचे योगदान कौतुकास्पद आहे, असे ही त्यांनी सांगितले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी जिल्हा रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांसह अमित राऊळ, मेघना राऊळ, प्रिया रेडीज, मेघा डुबळे,मेघना साळगावकर ,प्रशांत सावंत ,आनंद काष्टे, हेमंत पांगम ,साहिल सावंत , श्रेयस मुंज , आदींनी सहकार्य केले