
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या १८व्या केंद्रीय साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन २६ सप्टेंबरला सकाळी १०.३० वाजता होणार आहे. मारूती मंदिर परिसरातील साईरत्न कॉम्प्लेक्समध्ये हे कार्यालय आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे १८ वे केंद्रीय साहित्य संमेलन २७, २८ आणि २९ नोव्हेंबरला रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक संकुल येथे पार पडणार आहे.
या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी कार्यालय सुरू करण्यात येत आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी कोमसापचे सल्लागार आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या सोहळ्याला साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन १८ व्या केंद्रीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आणि कार्यवाह गजानन पाटील यांनी केले आहे.












