LIVE UPDATES

जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सभा, मिरवणूका आणि शस्त्रास्त्रांवर बंदी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 24, 2026 18:23 PM
views 35  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(१) व ३७(३) अन्वये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे.

हा आदेश २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दांडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगणे, तसेच अंगावरून टाकता येणारे पदार्थ किंवा कोणतेही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडण्यासाठी अथवा फेकण्यासाठीची साधने किंवा सामग्री बाळगणे, तयार करणे किंवा त्याचा वापर करणेही प्रतिबंधित करण्यात आले आहे.

तसेच व्यक्तींची किंवा त्यांच्या प्रतिमांची विटंबना होईल अथवा समाजाच्या भावना दुखावतील, अशा प्रकारचे प्रदर्शन करणे, सार्वजनिकरीत्या आक्षेपार्ह घोषणा, गाणी किंवा वाद्ये वाजविणे, तसेच सभ्यता किंवा नीतीला बाधक अथवा शांततेला धोका निर्माण करणारी भाषणे करणे आणि समाजात तेढ निर्माण करणारे साहित्य, वस्तू किंवा चित्रफिती प्रसारित करणे यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

कलम ३७(३) अन्वये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे, जमाव करणे, मिरवणूक काढणे व सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

या आदेशामधून शासकीय नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावताना आवश्यक असलेल्या बाबींना तसेच संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेतलेल्या व्यक्तींना अपवाद करण्यात आला आहे. तसेच लग्न, धार्मिक समारंभ आणि प्रेतयात्रा यांनाही या आदेशातील मनाई लागू राहणार नाही.

गणेशोत्सवाच्या काळात आयोजित कार्यक्रम, मिरवणुका किंवा अन्य उपक्रमांसाठी संबंधित प्राधिकरणाची परवानगी आवश्यक राहणार आहे.

मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३५ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.