LIVE UPDATES

आईच्या कुशीत पुन्हा विसावले चिमुकले सांबर

वनविभाग आणि रेस्क्यू टीमच्या संवेदनशीलतेने घडली मायलेकरांची भेट; भुईबावडा घाटातील हृदयस्पर्शी घटना
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 14, 2026 06:36 PM
views 853  views
Newborn sambar deer reunited with its mother by the Forest Department rescue team at Bhui Bawada Ghat.

वैभववाडी : जन्माला येऊन अवघे तीन-चार दिवस झालेले... जंगलातील वाटाही अद्याप न ओळखणारे... आणि अशातच आईपासून दुरावलेले एक चिमुकले सांबराचे पिल्लू! भुईबावडा घाटातील रस्त्यालगत आढळलेल्या या निष्पाप जीवाच्या डोळ्यांत जणू आईचा शोध सुरू होता. वाहनांची वर्दळ, जंगली प्राण्यांचा धोका आणि आईपासून झालेली ताटातूट अशा संकटांच्या सावटाखाली त्याचा जीव धोक्यात होता. मात्र, वनविभाग आणि रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे अखेर या चिमुकल्या जीवाला पुन्हा आईची माया मिळाली. आईची नजर पिल्लावर पडताच ती त्याच्याकडे धावत आली आणि काही क्षणांतच मायलेकरांची हृदयस्पर्शी भेट घडली.

भुईबावडा घाटातून प्रवास करणाऱ्या काही नागरिकांना रस्त्यालगत अवघ्या चार-पाच दिवसांचे सांबराचे पिल्लू दिसून आले. आईपासून दुरावलेले हे पिल्लू अत्यंत नाजूक अवस्थेत होते. परिसरातून सातत्याने होणारी वाहनांची ये-जा आणि जंगलातील अन्य वन्यप्राण्यांचा वावर पाहता त्याच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. नागरिकांकडून याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

वनक्षेत्रपाल कणकवली सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वैभववाडी सुरेश पटकारे, वनरक्षक भुईबावडा रामदास घुगे आणि वनसेवक कृष्णा पाताडे यांनी पिल्लाला पुन्हा त्याच्या आईपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, पिल्लाला सुरक्षितपणे आईजवळ सोडणे हे मोठे आव्हान होते. त्यामुळे कोणतीही घाई न करता, अत्यंत सावधगिरीने आणि संयमाने बचावकार्य हाती घेण्यात आले.

ज्या परिसरात पिल्लू आढळले होते, त्याच परिसरात त्याची आई असल्याचे लक्षात घेऊन पथकाने नियोजनपूर्वक प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत पिल्लाच्या हालचालींवर आणि परिसरावर लक्ष ठेवण्यात आले. अखेर पिल्लाला त्याच्या आईजवळ सुरक्षितपणे सोडण्यात आले. आईची नजर आपल्या पिल्लावर पडताच ती क्षणाचाही विलंब न करता त्याच्याकडे धावत आली.

काही वेळापूर्वी आईच्या मायेपासून दूर असलेले ते चिमुकले पिल्लू पुन्हा तिच्या कुशीत विसावले. मायलेकरांची ही भेट पाहून उपस्थितांच्याही चेहऱ्यावर समाधान उमटले. काही क्षणांतच आई आणि पिल्लू जंगलाच्या दिशेने निघून गेले.

वन्यजीव बचावकार्यात केवळ एखाद्या प्राण्याचा जीव वाचविणे एवढेच महत्त्वाचे नसते, तर शक्य असेल तेव्हा त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात आणि आईच्या सहवासात पुन्हा पोहोचविणेही तितकेच महत्त्वाचे असते. भुईबावडा घाटातील या घटनेत वैभववाडी व गगनबावडा वनविभाग आणि रेस्क्यू टीमने याच संवेदनशीलतेचे दर्शन घडविले.

त्यांच्या तत्परतेमुळे एका निष्पाप जीवाला नवे आयुष्य मिळालेच; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याची आईशी झालेली ताटातूट संपली आणि पुन्हा एकदा आईची माया त्याला अनुभवता आली. या बचाव मोहिमेत रेस्क्यू टीमचे रिद्धेश तेली, विठ्ठल बिडये, मयूर राणे, निलेश मोरये आणि हरेश सावंत यांचा सहभाग होता.