LIVE UPDATES

'त्या' रस्त्याच्या पाहणीसाठी अधिकारी पोहोचले भुईबावड्यात

कोकणसाद लाईव्हच्या बातमीचा इम्पॅक्ट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 17:33 PM
views 92  views

वैभववाडी : हेत खिंड ते भुईबावडा पहिलीवाडी या पर्यायी रस्त्याचे काम अवघ्या तीन महिन्यांत उखडल्याची बातमी कोकणसाद लाईव्हने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी आज भुईबावडा येथे प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून रस्त्याची पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती, उखडलेला भाग तसेच कामाच्या दर्जाची पाहणी करण्यात आली.

भुईबावडा गावासाठी हा रस्ता महत्त्वाचा पर्यायी मार्ग म्हणून तयार करण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यांतच रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. अनेक ठिकाणी रस्त्यावरील खडी उखडून खडी व माती बाहेर आली असून, वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. या निकृष्ट कामाबाबत कोकणसाद लाईव्हने व्हिडिओ बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना पाहणीसाठी पाठविले.

अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर फिरून कामाची पाहणी केली असून, कामाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक नोंदी केल्याचे समजते. दरम्यान, शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता इतक्या कमी कालावधीत खराब झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. कोकणसाद लाईव्हच्या बातमीचा इम्पॅक्ट होताच प्रशासन रस्त्यावर पोहोचले असून, आता या पाहणीनंतर पुढील कारवाई काय होते, याकडे भुईबावडा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.