LIVE UPDATES

बाप्पा पावला! गणेशोत्सवापूर्वी सिंधुदुर्गातील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतली आढावा बैठक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 17:49 PM
views 43  views

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांसह स्थानिक नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी रस्त्यांची दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेकडील रस्त्यांची सद्यस्थिती, देखभाल-दुरुस्ती आणि रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामांचा आज मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. मंत्रालयातील या बैठकीला मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सार्वजनिक बांधकाम विभागातील राष्ट्रीय महामार्गाचे सचिव संतोष शेलार, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत सहभागी झाले.

मंत्री नितेश राणे म्हणाले की, खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्याठिकाणी दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती व मजबुतीकरण करावे. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होईल, याची दक्षता घ्यावी. गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यातील रस्त्यांवर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. त्यामुळे चाकरमान्यांना तसेच स्थानिक नागरिकांना प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यांची नियमित देखभाल, खड्डे बुजविणे आणि आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. स्त्यांच्या कामांमध्ये केवळ खड्डे बुजविण्यापुरती कार्यवाही न करता रस्त्यांचा दर्जा आणि टिकाऊपणा यावर विशेष लक्ष द्यावे. दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे दर्जेदार पद्धतीने करण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले.

कणकवली फ्लायओव्हरची तातडीने दुरुस्ती

कणकवली फ्लायओव्हरवरील रस्त्याला खड्डे पडल्याने काही ठिकाणी पाणी साचत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी याठिकाणी तातडीने आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री श्री. नितेश राणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले. 

प्रमुख रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट करून अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करावीत. अशा ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना, दिशादर्शक फलक, रस्ता सुरक्षा साधने आणि इतर आवश्यक उपाय तातडीने करावेत, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले. रस्त्यांच्या कामांची नियमित पाहणी करून कामांचा दर्जा तपासावा तसेच संबंधित विभागांनी आपापल्या अखत्यारितील रस्त्यांची स्थिती सातत्याने तपासून आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.