LIVE UPDATES

भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ४२ हजार शोष खड्ड्यांचे उद्दिष्ट

सांडपाणी जमिनीत मुरवून जलसंवर्धनाला हातभार : ग्रामीण मजुरांच्या हातात १०.५० कोटी रुपयांची मजुरी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 02, 2026 08:53 PM
views 24  views

सिंधुदुर्ग : ग्रामीण भागातील घरगुती सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करून स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी गावे निर्माण करण्याबरोबरच जलसंवर्धन आणि ग्रामीण कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विकसित भारत – रोजगार आणि आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शोष खड्डे बांधकाम मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण जिल्ह्यासाठी ४२ हजार शोष खड्डे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यातून सुमारे ६ लाख मनुष्यदिवसांची निर्मिती होणार आहे. या कामाच्या माध्यमातून ग्रामीण मजुरांना अंदाजे १०.५० कोटी रुपये मजुरीच्या स्वरूपात अदा करण्यात येणार आहेत.

सध्या जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पाण्याची उपलब्धता कमी होत असताना पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरत आहे. अशा परिस्थितीत घरगुती सांडपाणी योग्य पद्धतीने शोष खड्ड्यांद्वारे जमिनीत मुरविण्याचे काम होणार असून, त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकविण्यास आणि स्थानिक स्तरावर भूजल पुनर्भरणास हातभार लागणार आहे.

म्हणजेच सांडपाण्याची समस्या सोडवितानाच पाणी जमिनीत मुरविण्याच्या जलसंवर्धनाच्या कामालाही गती मिळणार आहे. या जिल्हास्तरीय महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ गवळी टेंब, बांदा, सावंतवाडी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी बांदा येथील अंकिता अरुण देसाई, रा. गवळी टेंब, बांदा यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष शोष खड्ड्याचे बांधकाम करून या उपक्रमाचा प्रातिनिधिक स्वरूपात शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सावंतवाडीच्या सभापती सुष्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी निलेश जाधव, पंचायत समिती सदस्या  ऋतिका नाईक, ग्रामपंचायत बांदाच्या सरपंच प्रियंका नाईक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शोष खड्डे हा ग्रामीण भागातील घरगुती सांडपाणी व्यवस्थापनासाठी अत्यंत उपयुक्त आणि पर्यावरणपूरक उपक्रम आहे. घरातून निर्माण होणारे सांडपाणी शोष खड्ड्याद्वारे जमिनीत मुरविल्यामुळे परिसरात सांडपाण्याची डबकी साचत नाहीत. परिणामी डासांची उत्पत्ती, अस्वच्छता आणि रोगराईला आळा घालण्यास मदत होते. तसेच जमिनीतील ओलावा टिकविणे आणि भूजल पुनर्भरणास हातभार लावणे शक्य होते.

शोष खड्ड्यांमुळे घरांच्या परिसरातील परसबागांमध्ये भाजीपाला, केळी व इतर उपयुक्त झाडांच्या लागवडीस प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे घरगुती पोषणसुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि उपलब्ध पाण्याचा योग्य पुनर्वापर साध्य होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जलसंवर्धनासोबतच ग्रामीण जनतेच्या हाताला काम आणि हातात पैसा मिळणार आहे.

शोष खड्ड्यांच्या बांधकामासाठी स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील ४२ हजार शोष खड्ड्यांच्या उद्दिष्टातून सुमारे ६ लाख मनुष्यदिवस निर्माण होणार आहेत. या माध्यमातून अंदाजे १०.५० कोटी रुपये मजुरीच्या स्वरूपात ग्रामीण मजुरांना मिळणार आहेत.

विशेषतः दुष्काळसदृश परिस्थितीत शेती व इतर रोजगाराच्या संधी कमी होत असताना या अभियानामुळे ग्रामीण कुटुंबांना आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे. गावातील काम गावातच आणि मजुरीचा पैसा स्थानिक कुटुंबांच्या हातात, असा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण आर्थिक परिणाम साध्य होणार आहे. अशा प्रकारे एकाच उपक्रमातून स्वच्छता, आरोग्य, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, पोषणसुरक्षा आणि रोजगारनिर्मिती या बाबींचा समन्वय साधला जात आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


ताजी बातमी

View all

न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा जिल्हा वकील संघटनेकडून तीव्र निषेध
November 02, 2026
मुंबई मराठी साहित्य संघाच्या वि. स. पागे पुरस्काराने ॲड. देवदत्त परुळेकर यांचा गौरव
November 02, 2026
Bomb Threat : बॉम्बस्फोटाच्या मेलने सिंधुदुर्गात खळबळ
November 02, 2026
रेडीत आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
November 02, 2026
संबंधित बातम्या

View all

न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा जिल्हा वकील संघटनेकडून तीव्र निषेध
November 02, 2026
मुंबई मराठी साहित्य संघाच्या वि. स. पागे पुरस्काराने ॲड. देवदत्त परुळेकर यांचा गौरव
November 02, 2026
Bomb Threat : बॉम्बस्फोटाच्या मेलने सिंधुदुर्गात खळबळ
November 02, 2026
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर
November 02, 2026