LIVE UPDATES

आसोली - वडखोल रस्ता खचून पेंडसेंच्या घराला धोका

सभापती, उपसभापती, सदस्य, लोकप्रतिनिधीनी केली पहाणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 08, 2026 19:57 PM
views 180  views

वेंगुर्ला : आसोली- वडखोल येथील पेंडसे यांच्या घराशेजारी असणारा रस्ता खचून पेंडसे यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे तसेच यावर तात्काळ उपाययोजना न झाल्यास पुढे असणाऱ्या घरांचाही संपर्क तुटणार आहे. याची माहिती मिळताच वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, सदस्य संकेत धुरी, सार्वजनिक बांधकामचे उपकार्यकारी अभियंता शिंदे यांच्यासहित महायुतीच्या लोकप्रतिनिधीनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

     आसोली- वडखोल गावातील पेंडसे यांच्या घराजवळील रस्ता अचानक खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. बाजूलाच नैसर्गिक ओहोळ आहे. ओहोळला लागूनच हा रस्ता खचल्याने पेंडसे कुटुंबाच्या घराला धोका निर्माण झाला आहे  रस्ता खचल्यामुळे पुढे पावसात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. घराला असलेल्या धोक्यामुळे पेंडसे कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. याच रस्त्यावरून पुढे १५ कुटुंबे ये जा करतात. तसेच शेतीसाठी सुद्धा नागरिक याच रस्त्याचा अवलंब करतात यामुळे तात्काळ आपत्ती विभागाने याची दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. 

   यावेळी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, सदस्य संकेत धुरी, सार्वजनिक बांधकामचे उपकार्यकारी अभियंता शिंदे यांच्यासहित जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रीतम पवार, ग्रा प सदस्य राकेश धुरी, स्वप्नील गावडे, शिवसेना तालुका संघटक बाळा गावडे, सेनेचे मितेश परब, संजय गावडे, सत्यवान साटेलकर, ग्रामस्थ बाबाजी गावडे, गौरव पेंडसे, बाळा गावडे, प्रभाकर गावडे, प्रमोद धुरी, पोलीस पाटील सखाराम मुळीक आदींनी पाहणी केली. यावेळी याकडे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधणार असून लवकरच याबाबत कार्यवाही केली जाईल अशी माहिती उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी दिली.