LIVE UPDATES

'महाराजस्व समाधान शिबिरा'त उपविभागात १२ हजार २१२ लाभार्थ्यांना लाभ

सावंतवाडी तालुका आघाडीवर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 17:00 PM
views 26  views

सावंतवाडी : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी राबवण्यात आलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना'अंतर्गत सावंतवाडी उपविभागात एकूण १२ हजार २१२ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. ३१ जुलै अखेर मिळालेल्या विवरणपत्रानुसार सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीन तालुक्यांमध्ये विविध महसुली व सामाजिक योजनांचा निपटारा करण्यात आला. या अभियानांतर्गत सावंतवाडी तालुक्यातील तब्बल २ हजार ६९७ महिलांना 'शेतकरी' दर्जा प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली असून सावंतवाडी तालुका या कामात उपविभागात आघाडीवर राहिला आहे.

पारंपरिक शेती करणाऱ्या महिलांची ओळख आतापर्यंत चुल आणि मुल किंवा घर कामगार अशीच मर्यादित राहिली होती. मात्र, महाराष्ट्र शासनाने महिलांना "शेतकरी" म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार महिला शेतकरी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या दाखल्यांमुळे बँक, महसूल व विविध प्रशासकीय पातळ्यांवर महिलांना शेतकरी म्हणून शासकीय सवलती व फायदे मिळणार आहेत. आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आमदार केसरकर म्हणाले, महिलांनी विविध पातळ्यांवर काम करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावी. शेती-बागायतीसोबतच फळप्रक्रिया उद्योगात उतरून स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी विरसिंग वसावे, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

उपविभागातील एकूण १२,२१२ लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक ७,९५४ लाभार्थी सावंतवाडी तालुक्यातील आहेत. तर दोडामार्ग तालुक्यात ३,४५१ आणि वेंगुर्ला तालुक्यात १,८०७ लाभार्थ्यांना विविध दाखले, सवलती व योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. शेतकरी दर्जा प्रमाणपत्र भूमीहिनांना व महिलांना शेतकरी दर्जा देण्याच्या निर्णयानुसार उपविभागात एकूण २,८४७ जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली. यात सावंतवाडी तालुक्यातील २,६९७, वेंगुर्ल्यातील ८४ तर दोडामार्ग तालुक्यातील ६६ लाभार्थ्यांचा समावेश आहे.

'जीवंत सातबारा' मोहीम या अभियानांतर्गत उपविभागात सर्वाधिक २,०३३ लाभार्थ्यांना लाभ मिळाला. यामध्ये वेंगुर्ला १,१७५, दोडामार्ग ७७० आणि सावंतवाडीतील ८८ नागरिकांचा समावेश आहे. घरकूल योजना विशेष तरतूद घरकूल योजनेच्या विशेष तरतुदींचा उपविभागातील २,३८२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यामध्ये सावंतवाडी १,४१९, दोडामार्ग ८२१ आणि वेंगुर्ला ७० लाभार्थ्यांचा समावेश आहे. इतर योजनांचा लाभ 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते' योजनेअंतर्गत ८५ लाभार्थी, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत ४२ लाभार्थी (वेंगुर्ला), तर 'तुकडेबंदी' कायद्याच्या अंमलबजावणीअंतर्गत २३ लाभार्थ्यांना (सावंतवाडी) निर्णय दिला गेला. याशिवाय कुंभार समाजातील १११ व्यक्तींना पारंपरिक व्यवसायासाठी विविध सवलती देण्यात आल्या. शासकीय व इतर लाभ राज्य शासनाच्या इतर योजनांचा लाभ ५८२, केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ ४० आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शासकीय योजनांचा लाभ ५७० नागरिकांना मिळाला. या व्यतिरिक्त अन्य विविध शासकीय लाभांचा ३,४९७ नागरिकांना फायदा झाला आहे. या अभियानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचे दाखले आणि लाभ मिळणे अधिक सुलभ झाले असून सावंतवाडी उपविभागातील हजारो नागरिकांना याचा थेट दिलासा मिळाला आहे.