
दोडामार्ग : धार्मिक श्रद्धा, भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकीचा संगम साधणाऱ्या प. पू. समर्थ श्री राऊळ महाराज स्मारक मंदिर, साटेली-भेडशी येथील १० व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे कोणतीही सुई न टोचता प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येणारी मोफत आरोग्य तपासणी, विविध भजन मंडळांचे सुश्राव्य भजन, ह.भ.प. भाऊ नाईक यांचे कीर्तन, श्रींच्या पादुकांची पालखी मिरवणूक आणि रात्री सादर होणारा भव्य दशावतारी नाट्यप्रयोग! सद्गुरूंच्या भक्तीमय वातावरणात साजऱ्या होणाऱ्या या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांना आध्यात्मिक आनंदासोबतच आरोग्यसेवेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सद्गुरू राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी संचलित प. पू. समर्थ श्री राऊळ महाराज स्मारक मंदिर, साटेली-भेडशी, ता. दोडामार्ग येथे हा वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून प. पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी आणि सद्गुरू राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सुई न टोचता तपासणी...
या आरोग्य शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे मॅग्नेटिक अॅनालायझर मशीनच्या साहाय्याने कोणतीही सुई न टोचता शरीराची तपासणी करण्यात येणार आहे. या उपकरणाद्वारे शरीराच्या स्थितीविषयी ४९ तपशीलवार रिपोर्ट मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या शिबिरात प्रा. डॉ. एस. एन. ओझा ट्रस्ट, पणजी-गोवा तसेच अद्वैत चिकित्सालय, पिंगुळी यांचे सहकार्य लाभणार आहे.
डॉ. प्रशांत सामंत (B.A.M.S.) व त्यांची टीम, ‘डिझायर फार्मा’ तसेच मेनकाइंड फार्मा लिमिटेडचे राजेश धुरी आणि सोमनाथ कुडाळकर यांच्या माध्यमातून मधुमेह व युरिक अॅसिड तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘निरोगी आरोग्यासाठी, एक पाऊल समाधानाकडे!’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पहाटे काकड आरतीने सोहळ्याला प्रारंभ...
मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० ते ६ या वेळेत काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. सकाळी ७ ते ९ या वेळेत श्रींच्या चरणी अभिषेक, पाद्यपूजा आणि सार्वजनिक गाऱ्हाणे होणार आहे. सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत श्री भवानी सातेरी धारेश्वर महिला भजन मंडळ, घोटगे यांचे सुश्राव्य भजन होईल. त्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराला प्रारंभ होईल.
सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत श्री सातेरी महिला भजन मंडळ, खनयाळे यांचे भजन, तर दुपारी १२ ते १२.३० या वेळेत सातेरी केळबाई महिला भजन मंडळ, दोडामार्ग यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. दुपारी १२.३० वाजता श्रींची महाआरती होईल. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळेत श्री दत्तभजनी संगीत भजनी मंडळ, बच्चे सावर्डे, कोल्हापूर यांचे सुश्राव्य भजन रंगणार आहे.
दुपारी ३ ते ४.३० या वेळेत श्री हनुमान दामोदर प्रासादिक भजन मंडळ, भेडशी यांचे भजन होईल. त्यानंतर सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत ह.भ.प. श्री. भाऊ नाईक, वेतोरे यांचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता सांजआरती होईल. रात्री ८ ते १० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री ८ वाजता ढोलपथकाच्या ढोलवाद्यांच्या गजरात श्री प. पू. राऊळ महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीनंतर रात्री १० वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचा ‘देवी भद्रकाली’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या अशा विविध उपक्रमांनी सजलेल्या या वर्धापन दिन सोहळ्यात सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हावे. श्रींच्या दर्शनाचा, आशीर्वादाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सद्गुरू राऊळ महाराज संस्थानचे कार्याध्यक्ष विठोबा विनायक (अण्णा) राऊळ, विश्वस्त राजेंद्र म्हापसेकर, समस्त विश्वस्त मंडळ आणि स्थानिक व्यवस्थापन समिती, साटेली-भेडशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








