LIVE UPDATES

किल्ले रत्नदुर्गवर गड, शस्त्रपूजन सोहळा

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानची संकल्पना
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 22, 2026 06:00 PM
views 15  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागाच्या वतीने दसऱ्यानिमित्त गड व शस्त्रपूजन सोहळा किल्ले रत्नदुर्ग येथील महादरवाजा परिसरातील हनुमान मंदिर येथे पारंपरिक उत्साहात झाला. गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा आणि महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती जतन करण्याच्या उद्देशाने ‘आधी तोरण गडाला, मग घराला!’ या संकल्पनेतून याचे आयोजन केले.

या उपक्रमाला प्रतिष्ठानच्या मावळे व रणरागिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रथम गडाचे पूजन करून आपल्या ऐतिहासिक वारशाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यानंतर घरात सण साजरा करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. किल्ले रत्नदुर्गाच्या महादरवाजा परिसराची स्वच्छता केल्यानंतर ऐतिहासिक महादरवाजाला तोरण बांधून गडाला सणासुदीचे आणि मंगलमय स्वरूप प्राप्त करून देण्यात आले. पारंपरिक पद्धतीने गडपूजन व शस्त्रपूजन करून दसरा उत्सव साजरा केला.

कार्यक्रमाला जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर आणि त्यांचे सहकारी प्रमुख उपस्थित होते. मावळे व रणरागिणींच्या एकजुटीने आणि उत्साहपूर्ण सहभागाने संपूर्ण परिसरात शिवकालीन परंपरेची आणि ऐतिहासिक वारशाविषयीच्या अभिमानाची अनुभूती निर्माण झाली. गड-किल्ले हे केवळ ऐतिहासिक वास्तू नसून महाराष्ट्राच्या शौर्याचे, स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहेत. या वास्तूंचे जतन करणे, त्यांची स्वच्छता राखणे आणि पुढील पिढीपर्यंत त्यांचा इतिहास पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याच विचारातून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सातत्याने विविध संवर्धनात्मक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवत असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.