LIVE UPDATES

वझरे येथील कंपनीकडून ग्रामस्थ ,व्यावसायिकांची फसवणूक

लक्ष्मण गवस यांचे आमदार केसरकर यांना निवेदन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 22, 2026 06:12 PM
views 37  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

दोडामार्ग : वझरे येथील एका कंपनीकडून स्थानिक ग्रामस्थ आणि व्यावसायिकांची फसवणूक व पिळवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप लक्ष्मण दशरथ गवस यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन आमदार दीपक केसरकर यांना देऊन कंपनीला योग्य ती समज देण्याची मागणी करण्यात आली आहे.

 दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, कंपनीत मालाची वाहतूक करणारे तीन ट्रकपैकी एक ट्रक अचानक कमी केल्यामुळे संबंधित ट्रक मालकाचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. सद्यस्थितीत तीन टॅक्सी सुरू असून त्यांना किलोमीटरप्रमाणे योग्य मोबदला दिला जात नाही. पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी ॲम्बुलन्स, ड्रायव्हर, एम.बी.बी.एस. डॉक्टर व परिचारिका (नर्स) असा २४ तास स्टाफ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. मात्र गोव्यातून एक जुनी ॲम्बुलन्स आणून उभी करण्यात आली असून त्यावर ड्रायव्हरव्यतिरिक्त कोणताही वैद्यकीय स्टाफ उपलब्ध नाही. गार्डन, ॲम्बुलन्स, टॅक्सी, ट्रक यांसारखी लहान-मोठी कंत्राटे (ठेकेदारी) स्थानिक भूमिपुत्रांना डावलून बाहेरील (गोव्यातील) लोकांना दिली जात आहेत. तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर व इतर कर्मचारी वर्गही बाहेरीलच भरला जात आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता कंपनी प्रशासनाकडून संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना विचारा, आमचा काही संबंध नाही असे सांगून हात वर केले जातात, असा आरोप करण्यात आला आहे.