LIVE UPDATES

गणेशोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सभापती शंकर घारेंच्या सूचना

वीज, रस्ते, पोषण आहारासह विविध प्रश्नांवर पंचायत समितीच्या मासिक सभेत चर्चा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 20:11 PM
views 25  views

वेंगुर्ला : कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वच भागांत मूलभूत सुविधा सुरळीत ठेवण्याच्या सूचना सभापती शंकर घारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गणेशोत्सव काळात विद्युत पुरवठा सुरळीत राहावा, रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करावी, रस्त्यांच्या कडेला असलेली झाडी साफ करावी तसेच स्ट्रीट लाईटच्या पोलांवरील झाडी व वेली तातडीने हटवाव्या. ही कामे गणेशोत्सवापूर्वी प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देत त्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उपसभापती सचिन देसाई यांनी पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवानिमित्त पूजेचे साहित्य व प्रसाद भेट देत शुभेच्छा दिल्या.

वेंगुर्ला पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, नितीन मांजरीकर, संकेत धुरी, सुचिता वजराटकर, साक्षी नार्वेकर, प्रियांका घाटवळ, शीतल राऊत, योगिता परब यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार के. जी. गावडे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर वेंगुर्ला-बोरीवली बसफेरी पूर्ववत झाल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व आमदार दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव उपसभापती सचिन देसाई यांनी मांडला.

‘या एकाच विभागावर सभा चालवायची का?’ 

सभेत वारंवार विद्युत वितरण विभागाशी संबंधित प्रश्नच चर्चेला येत असल्याबद्दल उपसभापती सचिन देसाई यांनी नाराजी व्यक्त केली. “या एकाच विभागावर सभा चालवायची का?” असा सवाल उपस्थित करत तालुक्यातील विजेचे प्रश्न सोडवताना आपण कुठे कमी पडत आहोत, याचे आत्मचिंतन विद्युत वितरण विभागाने करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

उभादांडा येथे एका कुटुंबाला तब्बल १ लाख २० हजार रुपयांचे वीज बिल आले असून त्यांचा मीटर काढून नेण्यात आल्याचा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. याबाबत विचारणा केली असता लाईन लिकेजमुळे हे बिल आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र गणेशोत्सवाच्या काळात संबंधित कुटुंबाला अंधारात ठेवणे योग्य नसल्याचे सांगत, गणेशोत्सव काळात त्यांचा मीटर पुन्हा बसवावा आणि वीजपुरवठा खंडित करू नये. गणेशोत्सवानंतर पुढील कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना उपसभापती देसाई यांनी दिल्या.

स्ट्रीट लाईटच्या पोलांवरील झाडीबाबत चुकीचा अहवाल?

तालुक्यातील स्ट्रीट लाईटच्या पोलांवरील झाडी कटिंगचे काम पूर्ण केल्याचा अहवाल विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत सादर केला. मात्र या अहवालात चुकीची माहिती असल्याचे निदर्शनास आणून देत सभापती शंकर घारे यांनी अद्यापही अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईटच्या पोलांवर झाडी व वेली असल्याचे सांगितले. सदस्य सुचिता वजराटकर यांनी होडवडा उपकेंद्रासमोरील पोलावर अद्याप झाडी व वेली कायम असून त्या तातडीने साफ करण्याची मागणी केली.

केरवाडा जेटीचे काम अपूर्ण; मच्छिमारांच्या अडचणींकडे लक्ष देण्याची मागणी

सदस्य प्रियांका घाटवळ यांनी शिरोडा-केरवाडा जेटीचे काम अद्याप अपूर्ण असल्याचा मुद्दा उपस्थित केला. सध्या मासेमारीचा व्यवसाय सुरू झाल्याने या अपूर्ण कामाचा मच्छिमार बांधवांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गणेश विसर्जनही याच ठिकाणी होणार असल्याने स्थानिक नागरिकांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर संबंधित कामाची मुदत अद्याप शिल्लक असून पावसाळ्यानंतर काम सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सभापती घारे यांनी कामाला आमचा कोणताही आक्षेप नसून मच्छिमार बांधवांना कोणतीही अडचण होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. मासेमारीला अडथळा निर्माण होत असल्यास मेरिटाईम बोर्डाने त्यांची पर्यायी व्यवस्था करावी. तसेच अधिकाऱ्यांनी सदस्य प्रियांका घाटवळ यांच्यासह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करून त्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अंगणवाडीतील पोषण आहारावरून प्रश्नचिन्ह

अंगणवाड्यांमध्ये गरोदर माता, स्तनदा माता व लहान मुलांसाठी पॅकेटमध्ये देण्यात येणारा पोषण आहार लाभार्थी घरी घेऊन जात नसून तो गुरांना खाऊ घातला जात असल्याची बाब सदस्य प्रियांका घाटवळ व सुचिता वजराटकर यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

“आपल्याकडे हा पोषण आहार कोणीही खात नाही,” अशी परिस्थिती असून याबाबत ठराव घेऊन शासनाकडे पाठवावा अशी मागणी त्यांनी केली. यावर हा पौष्टिक धान्याचा आहार असून त्याला वेगळी चव असल्याने स्थानिकांकडून तो खाल्ला जात नसल्याची वस्तुस्थिती असल्याचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी सांगितले. पालकांना या आहाराचे महत्त्व समजावून सांगून त्याबाबत योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान, पोषण आहार शिजवून देणाऱ्या व्यक्तींकडे अन्नभेसळविषयक परवाना आहे का ? असा सवाल सदस्य सुचिता वजराटकर यांनी उपस्थित केला. परवाना नसलेल्या व्यक्तींनी पोषण आहार तयार करू नये, असे मत व्यक्त करत या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी त्यांनी केली.

स्मार्ट मीटरच्या सक्तीवरून सदस्यांचा आक्षेप

स्मार्ट मीटर बसवणे सक्तीचे करू नये, अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या असतानाही आपल्या मतदारसंघात स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवले जात असल्याचा आरोप सदस्य शीतल राऊत यांनी केला. यावर स्मार्ट मीटरबाबत अजूनही अनेक तक्रारी प्राप्त होत असून ग्राहकांना वाढीव वीज बिले येत असल्याचे उपसभापती सचिन देसाई यांनी सांगितले.

“जोपर्यंत तुमची गाडी रुळावर येत नाही, तोपर्यंत स्मार्ट मीटरची सक्ती नको,” असे स्पष्ट करत स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करावी, वाढीव वीज बिले का येत आहेत याचा शोध घ्यावा आणि ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करावे, अशा सूचना त्यांनी विद्युत वितरण विभागाला दिल्या. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना सदस्य विष्णू फणसेकर यांनी केली.

मोकाट जनावरांना रेडियम पट्टे लावण्याची मागणी

उभादांडा गावातून जाणाऱ्या वेंगुर्ला-शिरोडा सागरी महामार्गावर रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे फिरत असल्याने अपघात होत असल्याचा मुद्दा सदस्य साक्षी नार्वेकर यांनी उपस्थित केला. या जनावरांना रेडियमचे पट्टे लावण्यात यावेत, जेणेकरून रात्री वाहनचालकांना जनावरे स्पष्टपणे दिसतील आणि अपघात टाळता येतील, अशी सूचना त्यांनी पशुसंवर्धन विभागाला केली.

पंचायत समितीची वेबसाईट अपडेट करण्याची सूचना

वेंगुर्ला पंचायत समितीची स्वतंत्र वेबसाईट असून ती अधिक प्रभावीपणे वापरण्याची गरज असल्याचा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. पंचायत समितीच्या वेबसाईटवर तालुक्यातील महत्त्वाची माहिती, पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे, महत्त्वाची ठिकाणे, महिलांचे गृहउद्योग, बचत गटांचे व्यवसाय व उद्योग यांची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना सभापती शंकर घारे यांनी केली.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांना तसेच पर्यटकांना वेंगुर्ला तालुक्याची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यावर पंचायत समितीची वेबसाईट यापूर्वीच उपलब्ध असून ती नियमितपणे अपडेट करणे आवश्यक आहे. त्यासाठी १६व्या वित्त आयोगातून निधीची तरतूद करता येईल, अशी सूचना गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी केली.