
देवगड : तालुक्यातील वेळगिवे येथील जागृत देवस्थान स्वयंभू श्री देव रामेश्वर मंदिरानजीकच्या बारमाही वाहणाऱ्या ब्राम्हणदेव वहाळात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. याचा परिणाम तेथून कार्यान्वित नळयोजनेच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे. या समस्येकडे फणसगाव पंचायत समिती सदस्या समृद्धी चव्हाण व स्थानिक ग्रामस्थांनी पं. स. सभापती गणेश राणे यांचे लक्ष वेधले असून यावर आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आश्वासन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान दिले आहे.
यावेळी बापर्डे पंचायत समिती सदस्या संजना लाड, उपसरपंच सहदेव लाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळकृष्ण देवस्थळी, देवस्थानचे मानकरी श्री. लाड बंधू, माजी सरपंच संतोष चव्हाण, राजेश गिरी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील वेळगिवे येथील जागृत देवस्थान स्वयंभू श्रीदेव रामेश्वर मंदिरानजीक असणाऱ्या 'ब्राम्हणदेव' वहाळात बारमाही पाणी असते. या वहाळातील मुबलक पाणीसाठा लक्षात घेता तेथून वेळगिवेसह विठ्ठलादेवी, बुरंबावडे, वाघिवरे या गावांसाठी नळयोजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या नळयोजनेच्या माध्यमातून सदर गावांना दिवसरात्र पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु सद्यस्थितीत सदर वहाळात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून तेथील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाणही कमी असल्याने वहाळातील पाणीसाठा सदर नळयोजनेवरील गावांना पुरेसा नाही. येत्या काळात वहाळातील पाण्याची पातळी अधिकच खालावल्यास तेथून कार्यान्वित असणाऱ्या नळयोजनेवरील नळग्राहकांना पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जाऊ शकते. देवगड पंचायत समिती सभापती गणेश राणे यांनी नुकताच वेळगिवे भागाचा दौरा केला असता फणसगाव पंचायत समिती सदस्या समृद्धी चव्हाण व स्थानिक ग्रामस्थांनी ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
सभापती गणेश राणे यांनी तात्काळ घटनास्थळी जात वहाळ परिसराची पाहणी केली. यादरम्यान समृद्धी चव्हाण यांनी त्यांना वेळगिवेसह चार गावातील संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी वहाळातील गाळ उपसा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावर सभापती गणेश राणे यांनी सकारात्मक भूमिका घेत गाळ काढण्याच्या कामासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याच सूचना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला करण्यात येतील. तसेच सदर कामासाठी भरीव निधी उपलब्ध होण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
गाळ काढण्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी व या भागातील संभाव्य पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी आपणही प्रशासकीय पातळीवर निश्चितच पाठपुरावा करू, असे समृद्धी चव्हाण यांनी सांगितले.










