LIVE UPDATES

सावंतवाडीतील 'सीटीस्कॅन'चा २ वर्षात हजारोंना लाभ

रवींद्र चव्हाण यांचे मानले राजू मसूरकर यांनी आभार
Edited by: विनायक गांवस
Published on: June 04, 2026 19:54 PM
views 314  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयामध्ये सीटीस्कॅन मशिन कार्यान्वित होऊन आज दोन वर्ष झाली असून तब्बल २१ ते २२ हजार रूग्णांना याचा लाभ मिळाला. मोफत रिपोर्ट मिळत असल्याने गोरगरीब रुग्णांचा मोठा फायदा या निमित्ताने झाला असून जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे हे मशीन इथे बसविण्यात आले होते‌. यासाठी त्यांचे जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी आभार मानले आहेत.

४ जून २०२४ रोजी हे मशीन या ठिकाणी बसविण्यात आले होते. यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण यांचाकडे पाठपुरावा केला होता. यानंतर सावंतवाडी व कणकवली उपजिल्हा रुग्णालयांना  ही मशीन देण्यात आली.  पुणे येथील कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत गेली दोन वर्ष इथे सेवा दिली जात असून आजमितीला तब्बल २० ते २२ हजार रुग्णांना याचा लाभ झाला आहे. दिवसाला ३० ते ३५ मोफत रिपोर्ट इथे केले असून यात मॅनेजर प्रथमेश परब, नर्स आकांशा कानसे, शुभम कट्टीकर, टेक्नीशीयन तेजस पाटील, आदित्य सुतार यांची टीम कार्यरत आहे. सगळ्या प्रकारचे सीटीस्कॅन इथे मिळाल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा  दिलासा मिळाला आहे. यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान अध्यक्ष राजेंद्र मसूरकर यांनी रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.