
कणकवली : पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना आज गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात कणकवलीत निरोप दिला. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणेशमूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच गणेश भक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेत तसेच ढोल-ताशांच्या तालावर अनेकांनी ठेका धरत बाप्पांना निरोप दिला.
कणकवली शहरात गणपती सना येथे गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी भक्तांच्या चेहऱ्यावर उत्साहासोबतच बाप्पांना निरोप देताना भावुकता देखील दिसून आली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पाच दिवस भक्तांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पांचे भक्तिभावाने पूजन करून अखेर भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.











