
मालवण : पाण्याची टाकी साफ करत असताना अचानक झालेल्या गांधीलमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले साळकरवाडी येथील वाचनालय कर्मचारी महेश बळीराम साळकर (वय ३८) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना काल घडली. महेश यांच्या अकस्मात जाण्याने साळकरवाडी आणि कांदळगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल महेश साळकर हे आपल्या स्वतःच्या घरासमोरील जमिनीतील पाण्याची टाकी साफ करत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चुलत भाऊ जयवंत साळकर, तसेच शेजारी संजय साळकर आणि संतोष साळकर हे देखील मदत करत होते. टाकी साफ करण्याचे काम सुरू असताना जवळच असलेल्या माशांच्या पोळ्यावर अचानक पाणी गेले. यामुळे बिथरलेल्या माशांनी टाकी साफ करणाऱ्या चौघांवरही जोरदार हल्ला चढवला.
या हल्ल्यादरम्यान महेश साळकर हे टाकीच्या आत उतरून काम करत असल्याने त्यांना तात्काळ बाहेर पडता आले नाही. त्यामुळे माशांनी त्यांच्यावर जास्त प्रमाणात दंश केले. या हल्ल्यात महेश गंभीर जखमी झाले, तर इतर तिघेही किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ सुशांत सुर्वे यांनी सर्व जखमींना तात्काळ मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात दुपारी ४.३० ते ५ वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी सर्वांवर प्राथमिक उपचार करून इंजेक्शन दिले. महेश यांच्या अंगावर माशांचे जास्त दंश असल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवून औषधोपचार सुरू करण्यात आले.
प्रकृती स्थिर वाटल्याने रात्री ८ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. मात्र, घरी परतल्यानंतर रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास महेश शौचालयाला जाऊन आले आणि त्यांची तब्येत अचानक पुन्हा अत्यंत बिघडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुशांत सुर्वे यांनी त्यांना पुन्हा तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु, तेथे पोहोचल्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी तपासून महेश साळकर यांना मृत घोषित केले.
मृत महेश साळकर हे अत्यंत नम्र आणि शांत स्वभावाचे होते. त्यांच्यामागे वृद्ध वडील बळीराम साळकर, भाऊ विजय साळकर, विवाहित बहीण मंगल साळकर असा परिवार आहे. घरातील कर्त्या आणि तरुण मुलाचा असा अचानक दुर्दैवी अंत झाल्याने साळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.











