
वैभववाडी : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने चोख नियोजन केले आहे. शहरातील तीनही गणेश घाट सर्व सुविधांनी परिपूर्ण केले आहेत. गणेश आगमनानंतर उद्या सहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे .या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासन सज्ज झाले आहे.
तीनही विसर्जन घाटांची साफसफाई करण्यात आली आहे. तसेच गणेश घाटांकडे जाणारे रस्ते, स्ट्रीट लाईट सुस्थितीत केले आहेत. विसर्जनादरम्यान संभाव्य दुर्घटना घडल्यास तातडीने मदत व बचावकार्य करता यावे, यासाठी सेफ्टी जॅकेट, सेफ्टी रिंग आणि सेफ्टी रोप उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
गणेशोत्सव काळात विसर्जनासाठी नागरिकांची घाटांवर मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नगरपंचायतीने आवश्यक खबरदारी घेतली आहे. नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी स्वतः या तिन्ही ठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नगरपंचायत कर्मचाऱ्यांना योग्य त्या सुचना देऊन तिन्ही ठिकाणच नियोजन केले. विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. रावराणे यांनी केले आहे.











