LIVE UPDATES

स्थानिक राजकारणात न पडता कवितांचे गाव दोन महिन्यात तयार करा

उदय सामंतांच्या अधिकाऱ्यांना सुचना : मंगेश पाडगावकरांच्या साहित्यिक वारशाला चिरस्थायी स्वरूप देणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 18, 2026 19:42 PM
views 27  views

वेंगुर्ले : कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यिक स्मृतींशी जोडलेल्या उभादांडा येथील ‘कवितांचे गाव’ उपक्रमाला आता नावाला साजेसे दिमाखदार आणि दर्जेदार स्वरूप देण्यात येणार आहे. उभादांडा गावातील स्थानिक राजकारणात न पडता येत्या दोन महिन्यात कवितांचा गाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने उभा करा. किती निधी खर्च झाला, किती दालने झाली याचा अहवाल द्या अशा सक्त सूचना महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मराठी भाषा विभागाचे अधिकारी श्री. देवरे यांना केल्या.

यावेळी या प्रकल्पाचे सर्वांगीण अपग्रेडेशन करून उभादांड्याला महाराष्ट्रातील साहित्य पर्यटनाचे आदर्श केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगत यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच प्रशासन, स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

गणेशोत्सवानिमित्त उद्योग मंत्री आपल्या वेंगुर्ले येथील मूळ घरी आले असताना त्यांनी उभादांडा येथील ‘कवितांचे गाव’ या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान ग्रामस्थ, अधिकारी आणि संबंधित यंत्रणांकडून प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतरी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, माजी नगरसेवक नागेश गावडे, सामाजिक कार्यकर्ते हितेश धुरी, कार्मिस आल्मेडा आदी उपस्थित होते.

“मंगेश पाडगावकरांना खऱ्या अर्थाने आदरांजली द्यायची असेल, तर त्यांच्या साहित्यिक वारशाला चिरस्थायी स्वरूप देणारे ‘कवितांचे गाव’ उभे केले पाहिजे,” अशी भूमिका मंत्री सामंत यांनी मांडली.

पाच महत्त्वाच्या दालनांना मिळणार नवे रूप

‘कवितांचे गाव’ अधिक प्रभावी आणि आकर्षक करण्यासाठी परिसरातील पाच महत्त्वाच्या ठिकाणांची निवड करून तेथे सुसज्ज साहित्यिक दालने विकसित करण्याचे निर्देश मंत्री सामंत यांनी दिले. यामध्ये मंगेश पाडगावकर यांनी शिक्षण घेतलेल्या प्राथमिक शाळेचा, सध्या शून्य पटसंख्या असलेल्या शाळेचा, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दालनाचा, सद्यस्थितीत सुरू असलेल्या दलनाचा तसेच पाडगावकर यांच्या साहित्यिक प्रवासाशी संबंधित अन्य महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश करण्यात येणार आहे.

या प्रत्येक दालनाची स्वतंत्र संकल्पना निश्चित करण्यात येणार असून, तेथे मंगेश पाडगावकरांचे साहित्य, कविता, जीवनकार्य आणि साहित्यिक योगदान पर्यटक व साहित्यप्रेमींना अनुभवता येईल, अशा पद्धतीने दालने विकसित केली जाणार आहेत. यासंदर्भात मंत्री सामंत यांनी भाषा संचालकांशी दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या. तसेच स्थानिक राजकारणात न पडता अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.  

भिलारच्या धर्तीवर साहित्य पर्यटनाला चालना

सातारा जिल्ह्यातील ‘पुस्तकांचे गाव’ भिलारच्या धर्तीवर उभादांडा येथे साहित्य पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पर्यटक केवळ गाव पाहून न जाता येथे थांबावेत, कविता वाचाव्यात, पुस्तके पाहावीत आणि मंगेश पाडगावकरांच्या साहित्याचा अनुभव घ्यावा, हा या संकल्पनेमागील मुख्य उद्देश आहे.

सागरेश्वरासारख्या निसर्गरम्य परिसराच्या सान्निध्यात साहित्य आणि पर्यटनाचा संगम घडवून आणण्यावर भर देण्यात येणार आहे. गावात प्रवेश केल्यानंतर प्रत्येकाला ‘हे कवितांचे गाव आहे’, अशी अनुभूती मिळावी, यासाठी फलक, दिशादर्शक, माहितीफलक आणि परिसराचे सुशोभीकरण दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या.

दालनांसाठी स्वतंत्र एसओपी; व्यवस्थापनही शिस्तबद्ध

प्रत्येक दालनाच्या संचालनासाठी प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करण्यात येणार आहे. दालन कोणत्या वेळेत खुले राहील, पर्यटकांना कोणती माहिती दिली जाईल, साहित्य कशा पद्धतीने उपलब्ध करून दिले जाईल, पुस्तकांची व साहित्याची देखभाल कशी केली जाईल, दालनाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कोणाकडे असेल, याचे स्पष्ट नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे प्रकल्प केवळ उद्घाटनापुरता मर्यादित न राहता दीर्घकाळ प्रभावीपणे सुरू राहील, याची दक्षता घेण्यात येणार आहे.

मंगेश पाडगावकरांच्या नावाने दर्जेदार ग्रंथालय

उभादांडा येथे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने दर्जेदार ग्रंथालय उभारण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले. या ग्रंथालयात पाडगावकरांच्या साहित्याबरोबरच मराठी साहित्याचा समृद्ध ठेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

“आवश्यकतेपेक्षा अधिक पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू,” असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘कवितांचे गाव’ हे केवळ पर्यटनस्थळ न राहता वाचन, साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र बनविण्याची दिशा निश्चित झाली आहे.

अंतर्गत वाद बाजूला ठेवून साहित्यिक वारसा जपण्याचे आवाहन

उभादांड्याच्या विकासासाठी गावातील अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून मंगेश पाडगावकरांच्या साहित्यिक वारशाला केंद्रस्थानी ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले. गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल, अशी व्यवस्था करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली.

दोन महिन्यांची डेडलाइन; बीडीओ नोडल अधिकारी

‘कवितांचे गाव’ प्रकल्पाच्या संपूर्ण अपग्रेडेशनसाठी गटविकास अधिकारी (BDO) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. विविध विभागांमध्ये समन्वय साधून कामाला गती देण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. “आता कारणे शोधत बसण्याची वेळ नाही. पुढील दोन महिन्यांत प्रत्यक्ष बदल दिसला पाहिजे,” असा स्पष्ट संदेश सामंत यांनी प्रशासनाला दिला.