LIVE UPDATES

आता ड्रोनद्वारे आरोग्य सेवेचे वितरण

नंदुरबारमध्ये उपक्रमाचे लोकार्पण
Edited by: विनायक गांवस
Published on: June 04, 2026 18:59 PM
views 26  views

नंदुरबार : “दुर्गम, आदिवासी आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागांतील नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ड्रोन तंत्रज्ञानामुळे औषधे, लसी आणि वैद्यकीय साहित्य जलदगतीने पोहोचणार असून आरोग्य सेवा वितरण व्यवस्थेत नवा बदल घडून येईल,” असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. हसन मुश्रीफ यांनी केले. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागांसाठी सुरू करण्यात आलेल्या ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण प्रकल्पाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार राजेश पडवी, आमदार आमशा पडावी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक आश्विनी सानप, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी आशा गांगूर्डे, उपजिल्हाधिकारी( प्रशासन) प्रमोद भामरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे आदी उपस्थित होते. 

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम व भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागांतील नागरिकांना वेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम साकारण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच आयआयटी मुंबई यांच्या तांत्रिक सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे आरोग्य सेवा वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणार आहे,

या अभिनव उपक्रमामुळे दुर्गम भागांमध्ये औषधे, लसी, वैद्यकीय साहित्य तसेच प्रयोगशाळा तपासणीसाठी आवश्यक नमुने अल्पावधीत पोहोचविणे शक्य होणार असून आरोग्य सेवा अधिक गतिमान आणि परिणामकारक होणार आहे, असे पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले. 

प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बिलगाव ते सावर्या दिगर या सुमारे १८ किलोमीटर अंतराच्या मार्गावर ड्रोन सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ धडगाव तालुक्यातील झापी, बिलगाव, रोषमाळ तसेच अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा आणि जंगठी या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील ३३ गावांमधील २१ हजारांहून अधिक नागरिकांना होणार आहे.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, “पूरस्थिती, रस्ते संपर्क खंडित होणे, साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव किंवा इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये दुर्गम भागांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे हे मोठे आव्हान असते. ड्रोन तंत्रज्ञानामुळे या अडचणींवर प्रभावी मात करता येणार असून आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख होईल.”

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांमधील नर्मदा नदीकाठावरील अनेक गावे पावसाळ्यात संपर्कविहीन होतात. अशा परिस्थितीत आवश्यक औषधे, लसी आणि वैद्यकीय साहित्य वेळेत पोहोचविण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा अधिक जलदगतीने उपलब्ध होणार आहे.

“आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांचे आरोग्य संरक्षण अधिक सक्षम करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्याचा हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरेल,” असेही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागांतील आरोग्य सेवा वितरण व्यवस्थेला नवी गती मिळणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.