
सावंतवाडी : गणपती उत्सव काळात सालईवाडा साठेपांदण मार्ग आणि मोती तलाव परिसर दर्गंधीमुक्त करण्याबाबतची मागणी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्याकडे वीरेश ठाकूर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी दिलं आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सालईवाडा साठेपांदण मार्गावर असलेल्या नक्षत्र इमारतीमधील मळ टाकीतील अत्यंत दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यालगतच्या उघड्या गटारात मोठ्या प्रमाणावर सोडले जात आहे. या सांडपाण्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
नाकावर रुमालाला अत्तर लावून धरले तरीही हा त्रास सहन होत नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सव काळात नागरिकांकडे व भक्तांकडे गणपती दर्शनासाठी पाहुणे आणि नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. परंतु, सर्वांनाच या दुर्गंधीयुक्त वातावरणातून मार्ग काढत गणेशदर्शन घ्यावे लागणार आहे.
हे गटार सध्या तुडुंब भरून वाहत असून हे दुर्गंधीयुक्त पाणी थेट स्थानिक ओहोळात मिसळत आहे. हा ओहोळ पुढे मोती तलावाला जाऊन मिळत असल्याने तलावातील पाणी दूषित होऊन हिरवे पडले आहेत. याच मोती तलावात संपूर्ण सावंतवाडी शहरवासीयांना श्री गणेशाचे विसर्जन करावे लागणार आहे.
नगरपरिषदेकडे तक्रार प्राप्त झाल्यावर फक्त नक्षत्र इमारतीतील टाकीतील पाणी उपसण्याची सूचना दिली जाते. त्या सूचनेनुसार ठराविक रक्कम भरून टाकी खाली केली जाते. परंतु, काही दिवसांतच परिस्थिती पूर्ववत होते. टाकीची क्षमता संपली असल्यामुळे किंवा कायमस्वरूपी उपाययोजना नसल्यामुळे हा "खेळ" सातत्याने सुरू असून स्थानिक रहिवाशांना वर्षभराचे ३६५ दिवस या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या सांडपाण्याची आणि दुर्गंधीची पाहणी स्थानिक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष केलेली आहे. त्यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना असेलच.
३६५ दिवस हा दुर्गंधीयुक्त वास सहन करावा लागत असून किमान या पवित्र गणेश चतुर्थीच्या कालखंडात तरी रहिवाशांना आणि भाविकांना या दुर्गंधीपासून मुक्ती मिळावी. नगरपरिषदेने यावर तत्काळ आणि कायमस्वरूपी कडक कारवाई करून हा मार्ग व मोती तलाव परिसर तात्काळ दुर्गंधीमुक्त करावा, अशी मागणी याद्वारे करण्यात आली आहे.










