LIVE UPDATES

बांधकामाची कामे पूर्णत्वास नेऊन १०० टक्के निधी खर्च करा

सभापती संतोष साटविलकर यांचे आदेश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 11, 2026 20:42 PM
views 30  views

सिंधुदुर्गनगरी : विविध योजनांचे आराखडे निश्चित झाले असून त्यातील बांधकाम विभागाशी निगडीत असलेल्या कामांचा विभागाने आढावा घेऊन काम पूर्णत्वास नेण्यावर भर द्यावा. तसेच बांधकाम संदर्भात बांधकाम विभाग व वित्त विभागाने संयुक्तरीत्या आढावा घेऊन १०० टक्के निधी खर्च करावा. मात्र निधी मागे गेल्यास बांधकाम कार्यकारी अभियंता आणि वित्त अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल अशी सक्त ताकीद सभापती संतोष साटविलकर यांनी बांधकाम समिती सभेत अधिकाऱ्यांना दिली.

जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा शुक्रवारी (११ सप्टेंबर) छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती संतोष साटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सचिव तथा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, सदस्य संदेश सावंत, सदन कवठणकर, संजय बोबडी, सिद्धेश रावराणे, प्रमोद रावराणे, अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा परिषद स्वनिधी तसेच वित्त आयोगाच्या कामांचे आराखडे तयार असून कामांच्या याद्या निश्चित झालेल्या आहेत. वित्त आयोजच्या कामांचा ग्रामपंचायत विभागाने त्या त्या स्तरावर आढावा घेऊन हा निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याच बरोबर बांधकाम संदर्भातील कामांचा आढावा बांधकाम विभागाने घ्यावा त्यात काही अडचण येत असल्यास आपल्याशी संपर्क साधून त्यावर मार्ग काढावा असे सभापती संतोष साटविलकर यांनी सभागृहात स्पष्ट केले.

तसेच बांधकाम संदर्भात बांधकाम विभाग व वित्त विभागाने संयुक्तरीत्या आढावा घेऊन १०० टक्के निधी खर्च करावा. मात्र निधी मागे गेल्यास बांधकाम कार्यकारी अभियंता आणि वित्त अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल अशी सक्त ताकीद सभापती संतोष साटविलकर यांनी बांधकाम समिती सभेत अधिकाऱ्यांना दिली.

त्याचप्रमाणे १५ वित्त आयोगाच्या कामांची अंदाजपत्राने त्वरित करण्यात यावीत आणि बांधकाम विषयक किती प्रस्ताव आले. त्यांची सद्यस्थिती काय याबाबत पुढील सभेत आढावा घेतला जावा अशी सूचना सदस्य संदेश सावंत यांनी सभेत केली. 

अनुपस्थित सदस्यांच्या सूचनांवर चर्चा नाही

मागील बांधकाम समिती सभेत विविध सूचना सदस्यांनी मांडल्या होत्या. मात्र सूचना केलेले सदस्य आजच्या सभेला अनुपस्थित असल्याने त्यांच्या सूचनांवर आजच्या सभेत चर्चा करण्यात आली नाही. त्या सूचना राखून ठेवण्यात आल्या आहेत.