
नवी दिल्ली : कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या अनेक औषधांच्या किमतीत ९३ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. 'नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी'ने ५४३ औषध ब्रँड्स आणि त्यांच्या विविध पॅकेजिंग प्रकारांसाठी 'मॅक्झिमम रिटेल प्राईस' म्हणजेच कमाल किरकोळ किमती सुधारित केल्या आहेत. या नवीन किमती ९ नोव्हेंबरपासून लागू होतील.
कर्करोगावरील उपचार केवळ रुग्णासाठीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी एक मोठे आव्हान ठरतात. रुग्णालयातील खर्चाव्यतिरिक्त, औषधांचा मासिक खर्च हजारो ते लाखो रुपयांपर्यंत असू शकतो. मात्र, या निर्णयामुळे कर्करोगी रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
कर्करोग तज्ज्ञांच्या मते, औषधांवरील महिन्याच्या खर्चामध्ये काही हजार रुपयांची घट होणेही कुटुंबांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. अनेक नवीन आणि अत्यंत महागड्या कर्करोगविरोधी औषधांच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
'नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीचा हा निर्णय कर्करोगविरोधी १३७ औषधांच्या ट्रेड मार्जिनवर ३० टक्क्यांची मर्यादा घालण्याच्या निर्णयाचा एक भाग आहे. औषधांचा पुरवठा करणाऱ्या चैनमधील नफ्याचे प्रमाण मर्यादित ठेवून रुग्णांसाठी औषधे अधिक परवडणारी बनवणे हा यामागचा उद्देश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन यादीत स्तन कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या 'पॅल्बोसायक्लिब' या औषधाच्या काही ब्रँड्सच्या किमतीत सर्वाधिक, म्हणजेच सुमारे ९३.३ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. याच औषधाच्या 'आयसोजेन' ब्रँडच्या (१०० मिग्रॅ पॅक) किमतीतही ९१.६ टक्क्यांची घट झाली आहे. केमोथेरपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'थिओटेपा' या औषधाच्या 'सॅमटेपा' ब्रँडच्या १०० मिग्रॅ व्हायलची किंमत ८०,०७१.८६ रुपयांवरून ७,१५०.३३ रुपयांपर्यंत खाली आली आहे. यामुळे प्रति व्हायल सुमारे ७२,९२२ रुपयांची बचत होईल.
त्याचप्रमाणे, स्तन कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या 'ॲनास्ट्रोझोल' या औषधाच्या 'वोमाझोल' ब्रँडची किंमत ४५८.८५ रुपयांवरून ३९.५२ रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. डॅसॅटिनिब, लेन्वॅटिनिब, अबिराटेरोन आणि ओलापारिब यांसारख्या इतर औषधांच्या किमतीतही कपात करण्यात आली आहे. मात्र, या कपातीनंतरही अनेक महागड्या कर्करोगविरोधी औषधांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








