LIVE UPDATES

Devgad News : वाघिवरे-वेळगिवेत बीएसएनएल टॉवरचा मार्ग मोकळा

भूमिपूजन उत्साहात ; सभापती अनुराधा नारकर यांच्या हस्ते शुभारंभ
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 29, 2026 03:01 PM
views 26  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड :  वाघिवरे-वेळगिवे गावातील मोबाईल नेटवर्कची समस्या दूर होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बीएसएनएल टॉवरच्या कामाचे भूमिपूजन महिला व बालकल्याण सभापती सौ. अनुराधा नारकर यांच्या शुभहस्ते वेळगिवे येथे उत्साहात संपन्न झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम मार्गी लागल्याने दोन्ही गावांतील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्कची समस्या दूर होऊन संपर्कव्यवस्था अधिक सक्षम व्हावी, या दृष्टीने बीएसएनएल टॉवर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सुविधेमुळे ग्रामस्थांना मोबाईल नेटवर्कचा अधिक चांगला लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या कु. समृद्धी संतोष चव्हाण, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच वाघिवरे आणि वेळगिवे गावांतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाघिवरे-वेळगिवे गावांच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने सहकार्य केले असून, या कामासाठीही त्यांनी प्रयत्न केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. बीएसएनएल टॉवरच्या उभारणीमुळे दोन्ही गावांच्या संपर्कव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.