
पणजी : ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. गुरुवारी पहाटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नाना पाटेकर यांची प्रकृती पहाटे २:३० वाजल्यापासूनच बिघडली होती आणि त्यांना अस्वस्थता जाणवत होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
डॉ. शेखर साळकर म्हणाले, "आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी पहाटे २:३० च्या सुमारास एका मित्राला मेसेज करून आपली प्रकृती ठीक नसल्याचे कळवले होते. मात्र, कदाचित मध्यरात्र असल्याने त्या मित्राला तो मेसेज वेळेवर दिसला नाही. जेव्हा तो मित्र पहाटे त्यांच्या घरी पोहोचला, तेव्हा नानांना घाम फुटला होता. त्यांनी नानांच्या केअरटेकरला रुग्णालयात पाठवले. तो आमची रुग्णवाहिका घेऊन घरी गेला."
"आमच्या वैद्यकीय पथकाने त्यांना कार्डियाक मसाज दिला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता."
"आम्ही 'मेडिको-लीगल' प्रकरण नोंदवले आहे आणि मृतदेह आता शवविच्छेदनासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे. हे प्रकरण 'कार्डियाक अरेस्ट'चे होते, परंतु त्यामागचे मूळ कारण आम्हाला माहित नाही. केअरटेकरकडे कोणतीही वैद्यकीय कागदपत्रे नव्हती. त्यावरून आम्हाला त्यांच्या मेडिकल हिस्ट्रीची माहिती मिळू शकली असती." अशी माहिती डॉ. शेखर साळकर यांनी दिली.














