
मुंबई : बॉलिवूड स्टार आमिर खानचा पुतण्या आणि अभिनेता इम्रान खान याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडून जाण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतची नोटीस पोलिसांनी बजावली आहे. मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात 10 ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीसह विविध संघटनांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे इम्रान खानवर ही कारवाई करण्यात आली आहे.
इम्रान खान, त्याची मैत्रीण लेखा वॉशिंग्टन आणि चुलत बहीण झेन मेरी खान यांच्यासोबत ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलनात सहभागी झाला होता. या आंदोलनाद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. निदर्शनादरम्यान, मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. पोलीस व्हॅनमध्ये असताना, इम्रान खानने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि त्यावर "असं वाटतंय की मी एका सफरीवर निघालो आहे," अशी कॅप्शन दिली होती.
इम्रान खान हा भारतीय नागरिक नाही. त्याचा जन्म अमेरिकेतील विस्कॉन्सिनमध्ये झाला असून, त्याच्याकडे अमेरिकन पासपोर्ट आणि 'ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया' कार्ड आहे. परदेशी नागरिकांना भारतातील आंदोलनांमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. असे केल्यास त्यांच्यावर 'इमिग्रेशन ॲक्ट' (स्थलांतर कायदा) अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी इमरान खानच्या आंदोलनातील सहभागावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या अभिनेत्याला आता २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जाण्याची अधिकृत नोटीस देण्यात आली आहे.
इम्रान खानने आतापर्यंत १३ चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यामध्ये 'जाने तू... या जाने ना' (२००८), 'आय हेट लव्ह स्टोरीस' (२०१०), 'दिल्ली बेली' (२०११) आणि 'मेरे ब्रदर की दुल्हन' (२०११) यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.













