LIVE UPDATES

Nitesh Rane Hindu Awareness Campaign : बांद्यापासून चांद्यापर्यंत हिंदू जनजागृती मोहीम

नितेश राणेंच्या उपस्थितीत शुभारंभ : हलाल प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून जनजागृतीचा निर्धार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 16:54 PM
views 26  views
Maharashtra minister Nitesh Rane addresses attendees at the launch of a Hindu awareness campaign in Banda, Sindhudurg

बांदा : हिंदू जनजागृतीच्या उद्देशाने बांद्यापासून चांद्यापर्यंत मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजाने संघटित होऊन आपल्या धार्मिक परंपरा आणि श्रद्धांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले.

हलाल प्रमाणपत्र, त्यासाठी आकारले जाणारे शुल्क, धार्मिक परंपरा आणि हिंदू समाजाची एकजूट या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणात हिंदू जनजागृती मोहिमेचे समर्थन करत समाजाने संघटित होण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी मोहिमेचे संयोजक प्रसन्न शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, लवू म्हाडेश्वर, बांदा व्यापारी संघटनेचे सचिव निलेश नाटेकर, सावंतवाडीचे उपसभापती गौरव मुळीक, बांदा उपसरपंच रत्नाकर आगलावे आणि मधुकर देसाई यांच्यासह उपस्थित हिंदू बांधव-भगिनी आणि तरुणांना त्यांनी संबोधित केले.

हलाल प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री श्री. राणे यांनी काही खासगी संस्था आणि कंपन्यांकडून प्रमाणपत्रांसाठी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप केला. या प्रमाणपत्रांना सरकारी मान्यता आहे का ? तसेच त्यातून जमा होणाऱ्या शुल्काचा वापर कशासाठी केला जातो, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या विषयाची माहिती घेऊन नागरिकांनी ग्राहक म्हणून जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

भगवद्गीतेचा संदर्भ देत  नितेश राणे यांनी हिंदू धर्मातील श्रद्धा, धार्मिक परंपरा आणि सामाजिक आचरण यांविषयी आपली भूमिका मांडली. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवादरम्यान काही ठिकाणी घडल्याचा घटनांचा उल्लेख करत हिंदूंच्या सण-उत्सवांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, असे ते म्हणाले.

गोमातेविषयीची हिंदू समाजाची श्रद्धा, धार्मिक पूजापद्धती आणि सण-उत्सव साजरे करण्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. इतर धर्मांच्या सणांमध्ये हिंदूंनी हस्तक्षेप करू नये आणि त्याचप्रमाणे हिंदूंच्या सणांमध्येही अडथळे आणले जाऊ नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आपल्या भाषणात त्यांनी विविध धार्मिक समुदायांविषयी टीका आणि आरोपही केले. हिंदुत्वाच्या कार्यासाठी केवळ मंत्री, आमदार किंवा इतर पदाधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता समाजातून अधिक कार्यकर्ते तयार होणे आवश्यक असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

राजकीय पदे ही तात्पुरती असतात त्यामुळे समाजातील प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून जनजागृतीच्या कामात सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांतील हिंदू समाजाने आपल्याला ५८ हजार मतांनी निवडून आणल्याचा उल्लेखही त्यांनी भाषणात केला.

बांद्यापासून सुरू होणारी ही हिंदू जनजागृती मोहीम चांद्यापर्यंत पोहोचली पाहिजे. सिंधुदुर्ग, कोकण आणि महाराष्ट्रात या मोहिमेसाठी जिथे माझ्या सहकार्याची गरज भासेल, तिथे मी हक्काने उपलब्ध असेन. हिंदू म्हणून इतर मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करावे आणि जनजागृतीच्या या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले. 

दरम्यान, मोहिमेचे संयोजक प्रसन्न शिंदे यांनी आपल्या भाषणात हलाल प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून काही खासगी संस्था आणि कंपन्यांकडून व्यावसायिकांकडून शुल्क आकारले जात असल्याचा आरोप केला. या शुल्कामुळे उत्पादकांच्या वस्तूंच्या किमती वाढतात आणि त्याचा आर्थिक भार सर्वसामान्य ग्राहकांवर पडतो, असे त्यांनी सांगितले.

या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीच्या वापराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणात राज्य सरकारने लक्ष घालावे आणि मुख्यमंत्री स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली.

नितेश राणे यांच्या निर्देशानुसार प्रमोद सावंत यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केल्याचे सांगत त्यांनी आभार मानले. हिंदू समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही जनजागृती मोहीम बांद्यापासून चांद्यापर्यंत पोहोचविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. तर प्रमोद कामत यांनी नितेश राणे हे हिंदुत्ववादी विचारांचे प्रचारक असून हिंदू समाजावर अन्याय झाल्यास न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतात, असे ते म्हणाले.

प्रसन्न शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या मोहिमेला बांदा येथून सुरुवात होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाच्या माध्यमातून बांद्याचे नाव महाराष्ट्रभर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिंदुत्वाच्या कार्यासाठी सर्वांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. या मोहिमेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.