LIVE UPDATES

MLA Nilesh Rane : लाखे वस्तीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

आमदार निलेश राणे यांचा शब्द
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 16:37 PM
views 30  views
MLA Nilesh Rane addresses residents at a programme in Lakhe Nagar, Sawantwadi

सावंतवाडी : लाखेवस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही. स्थानिकांच्या ज्या काही मागण्या असतील, त्या आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, असा शब्द कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी दिला. लाखे नगर येथील दुर्गामातेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, सीमा नाईक, ॲड. सायली दुभाषी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भाळेकर, मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना केवळ शासनाकडून सर्व अपेक्षा न ठेवता प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याची गरज आहे. विशेषतः तरुण मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले. यावेळी महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून मुक्त कर, असे साकडेही त्यांनी दुर्गामातेला घातले.

लाखे वस्तीच्या विकासासाठी सावंतवाडी नगरपरिषद कार्यशील असून या भागातील नागरिकांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे असे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. तसेच लाखे वस्तीतील २५ मुलांना भविष्यात एमआयडीसीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

स्थानिक नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी राखीव जागेतील सभागृहासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती यावेळी दिली. तसेच सिताराम गावडे यांनी समाजातील गोरगरीब, दिनदुबळे, पीडित, कष्टकरी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधींची समाजाला गरज आहे. आमदार निलेश राणे सभागृहात जनतेचे प्रश्न ज्या पोटतिडकीने मांडतात आणि ते सोडविण्यासाठी प्रयत्न करतात, ही बाब उल्लेखनीय आहे.

सत्तेत असतानाही सत्तेच्या विरोधात जनतेचे प्रश्न मांडणे हे सोपे काम नाही. त्यामुळे सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन दिले पाहिजे. लाखे वस्तीतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आमदार निलेश राणे निश्चितपणे प्रयत्न करतील, असा विश्वास केला. वस्तीतील मुलांनी चांगले शिक्षण घेऊन स्वतःचे भविष्य घडवावे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. गावडे यांनी केले.

दरम्यान, रासाई कला-क्रीडा मंडळाच्यावतीने आमदार निलेश राणे यांना निवेदन सादर करण्यात आले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या हद्दीतील लाखे वस्तीमध्ये असलेल्या रिकाम्या जागेत २५ नवीन घरे बांधून मिळावीत, अशी प्रमुख मागणी या निवेदनातून करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.