
दोडामार्ग : पत्नीसोबत झालेल्या कौटुंबिक वादातून संतापलेल्या एका परप्रांतीय तरुणाने दोडामार्ग बाजारपेठेत धुमाकूळ घालत व्यापारी प्रशांत नाईक (केरकर) यांच्या कारची दर्शनी काच लाकडी रिपेने फोडल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या दोन तासांत संशयित तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे व्यापारी वर्गातून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोडामार्ग येथे वास्तव्यास असलेल्या उत्तर प्रदेश येथील संबंधित तरुणाचे मंगळवारी पहाटे ३:३० वा.च्या सुमारास पत्नीसोबत भांडण झाले. या वादातून संतापलेल्या तरुणाने थेट दोडामार्ग बाजारपेठ गाठली.
यावेळी व्यापारी प्रशांत नाईक यांनी आपली चारचाकी नेहमीप्रमाणे दुकानासमोर उभी केली होती. या गाडीला लक्ष्य करत संशयिताने लाकडी रिपेच्या साहाय्याने कारची दर्शनी काच फोडली. एवढेच नव्हे, तर तोडफोड करण्यासाठी वापरलेली लाकडी रिप त्याने गाडीच्या आतच टाकून दिली. मंगळवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रशांत नाईक यांनी तातडीने दोडामार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला.
महिला पोलीस कर्मचारी गवस यांनीही या प्रकरणात विशेष तत्परता दाखवली. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत संशयिताचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पत्नीसोबत झालेल्या वादातून संतापाच्या भरात आपणच कारची काच फोडल्याचे संशयिताने सांगितल्याची माहिती मिळाली.
विशेष म्हणजे, याचदरम्यान संबंधित तरुणाची पत्नीही पतीकडून झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पतीने आपल्याला मारहाण केली असून, वादादरम्यान तुझी हिंमत असेल तर गाडीची काच फोडून दाखव, असे तो बोलत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, संबंधित तरुण ज्या ठिकाणी कामाला आहे, त्या मालकाने पुढाकार घेत कारच्या नुकसानीची भरपाई देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे वाहनाच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, पतीकडून पुन्हा मारहाण झाल्याची तक्रार करत संबंधित महिला आपल्या लहान मुलासह पोलीस ठाण्यात उपस्थित होती. या प्रकरणी पोलिसांकडून योग्य ती कायदेशीर व प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. तक्रार मिळताच अवघ्या दोन तासांत संशयिताला ताब्यात घेऊन तत्परतेने कारवाई केल्याबद्दल व्यापारी प्रशांत नाईक यांनी दोडामार्ग पोलिसांचे आभार मानले आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








